कोरेगावात ठिणगी! शशिकांत शिंदेंचे महेश शिंदेंना खुलं आव्हान;
.
16 January, 2026
कोरेगावात ठिणगी! शशिकांत शिंदेंचे महेश शिंदेंना खुलं आव्हान; "पार्सल" वक्तव्यावरून रणकंदन'
कोरेगाव: दि.१६(जरंडेश्वर समाचार): सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या कोरेगाव मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष आता विकोपाला गेला आहे. आमदार महेश शिंदे यांनी मला आव्हान देण्याची भाषा करू नये"मला पाडण्याची तुमची हिंमत नव्हती, जर मला पाडले नसते तर तुमचा राजकीय जन्मही झाला नसता," अशा अत्यंत बोचऱ्या आणि आक्रमक शब्दांत आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित करत शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदेंचे नाव न घेता त्यांना थेट 'ओपन चॅलेंज' दिले आहे. "मी कुणाच्या नादाला लागत नाही, पण लागलो तर सोडत नाही," या त्यांच्या वाक्याने कोरेगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे
'अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका' असा टोला लगावत त्यांनी थेट समोरासमोर येण्याचे आव्हान दिल्याने कोरेगावातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
'पार्सल' विधानावरून संताप
गेल्या काही दिवसांपासून आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा उल्लेख 'बाहेरून आलेले पार्सल' असा केल्याचा दावा केला जात आहे. या विधानाचा समाचार घेताना शशिकांत शिंदे आक्रमक झाले. "हे विधान अत्यंत बेजबाबदार आणि चुकीचे आहे. जनतेने मला निवडून दिले होते, हे विसरू नका," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी!
मतदारसंघात दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप करत शशिकांत शिंदे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. "मी कोणाच्या वाटेला जात नाही, पण आडवा आला तर त्याला सोडत नाही. कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचे प्रकार थांबवा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे," असा दम त्यांनी यावेळी भरला.
जिथे सांगाल तिथे मी एकटा येतो!
वैयक्तिक प्रतिष्ठेच्या बनलेल्या या लढाईत शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदेंना थेट शड्डू ठोकून आव्हान दिले आहे. "कुठे यायचे ते सांगा, मी तिथे एकटा यायला तयार आहे," असे म्हणत त्यांनी हे युद्ध आता वैयक्तिक पातळीवर नेऊन ठेवले आहे. या संघर्षाचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटणार असून कोरेगावचा गड कोण राखणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय