प्रसंगी काँग्रेसचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय – रणजितसिंह देशमुख
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ठाम भूमिका
16 January, 2026
सातारा, दि. १५ (जरंडेश्वर समाचार) : भारतीय जनता पक्षाचे धोरण शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि वंचित घटकांच्या विरोधात आहे. भाजपकडून या घटकांना मातीमोल करण्याचे काम सुरू असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा पराभव करणे हे काँग्रेसचे प्रथम उद्दिष्ट आहे. मात्र, काँग्रेस पक्षाला गृहीत धरून जर कोणी भूमिका घेतली, तर काँग्रेस पक्ष प्रसंगी संपूर्ण जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेईल, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी, ब्लॉक अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा भाजपला सत्ता मिळवणे अधिक महत्त्वाचे वाटत असून, सत्तेसाठी भाजपकडून अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू आहे. पैशाचा प्रचंड वापर, दडपशाही आणि दहशत निर्माण करण्याचे काम भाजपने खुलेआम सुरू केले आहे. सामान्य जनतेला अधिक कमजोर करणाऱ्या भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जोमाने उतरलेली आहे.
जिल्ह्यातील समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत काँग्रेस निश्चितच योग्य व सकारात्मक भूमिका घेईल. मात्र, आघाडीतील घटक पक्षांनी काँग्रेस पक्षाला सन्मानाने विचारात घेऊनच निर्णय घ्यावेत. अन्यथा काँग्रेस पक्ष संपूर्ण जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढवण्यास पूर्णपणे सज्ज आहे. प्रदेश काँग्रेसकडून तशा स्पष्ट सूचना प्राप्त झाल्या असून, त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते एकजुटीने निर्णय घेतील, असा ठाम निर्धार आजच्या बैठकीत सर्व प्रमुख कार्यकर्ते व ब्लॉक अध्यक्षांनी व्यक्त केला.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तालुकानिहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
कराड – प्रताप देशमुख
पाटण – झाकीर पठाण
खटाव – संजय तडाखे
वाई – सौ. रजनी पवार
माण व खंडाळा – अमर करंजे
फलटण – जगन्नाथ कुंभार
सातारा – सौ. सुषमाराजे घोरपडे
कोरेगाव – बाबासाहेब कदम
जावळी व महाबळेश्वर – पांडुरंग यादव
या बैठकीस जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस भानुदास माळी, ज्येष्ठ नेते विजयराव कणसे यांच्यासह बाबासाहेब कदम, झाकीर पठाण, नगरसेवक पंकज पवार, संजय तडाखे, सुषमाराजे घोरपडे, प्रताप देशमुख, पांडुरंग यादव, नाजीम इनामदार, अमर करंजे, राजेंद्र शेलार, रफिकशेठ बागवान, जगन्नाथ कुंभार, आनंदराव जाधव, पार्थ गायकवाड, संभाजी उतेकर तसेच सर्व तालुक्यांचे ब्लॉक अध्यक्ष व मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय