single-post

प्रतापसिंह हायस्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावा; साताऱ्यात ५० कोटींचे ग्रंथालय व्हावे -सुरेश बोतालजी

लोक पँथरचे २९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन; अभ्यासक्रमात संविधान समाविष्ट करावे

24 December, 2025

सातारा दि.२५ (जरंडेश्वर समाचार)  | भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण ज्या ऐतिहासिक शाळेत झाले, त्या सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा या मागण्यांसाठी सोमवार दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोक पँथरचे संस्थापक-अध्यक्ष जेष्ठ पत्रकार सुरेश बोतालजी यांनी दिली.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत घेतले होते. त्यामुळे शाळेच्या आवारात पुतळा उभारल्यास विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, संविधानिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकी दृढ होईल, 

"५० कोटींचे आधुनिक ‘ज्ञानकेंद्र’"

 साताऱ्याच्या शैक्षणिक वैभवात भर घालणारे ५० कोटी रुपयांचे अत्याधुनिक "विश्वरत्न ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या  नावाने ग्रंथालय’ शहरात उभारावे, अशी प्रमुख मागणी आहे. तसेच संशोधक, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी , अभ्यासिका आणि वाचकांसाठी हे ग्रंथालय आधुनिक ज्ञानकेंद्र म्हणून विकसित करण्यात यावे.

"अभ्यासक्रमात संविधानाचा स्वतंत्र धडा"

शालेय स्तरावरूनच विद्यार्थ्यांना देशाच्या सर्वोच्च कायद्याची समज व्हावी, यासाठी प्राथमिक ते माध्यमिक शाळा,उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात ‘भारतीय संविधान’ हा स्वतंत्र धडा समाविष्ट करावा, 

 ७ नोव्हेंबर हा दिवस देशभर “विदयार्थी दिन” म्हणून साजरा करण्यात यावे, तसेच आंतरराष्ट्रीय शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा करावा या सर्व मागण्या त्वरित मान्य करण्यात यावे, या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल महोदय, राष्ट्रपती महोदय ,प्रधानमंत्री  यांना निवेदन पाठवण्यात येणार आहे.

"ऐतिहासिक वारसा : प्रतापसिंह हायस्कूल"

स्थापना : साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या काळातील ही ऐतिहासिक वास्तू; १९५१ मध्ये नामकरण ‘प्रतापसिंह हायस्कूल’.

ऐतिहासिक नोंद : ७ नोव्हेंबर १९०० — शाळेच्या रजिस्टर (क्र. १९१४) मध्ये ‘भिवा रामजी आंबेडकर’ अशी नोंद.

विद्यार्थी दिन : २००३ पासून ‘शाळा प्रवेश दिन’; तर २०१७ पासून राज्य शासनाने ७ नोव्हेंबर ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

नामवंत माजी विद्यार्थी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी सरन्यायाधीश पी.बी. गजेंद्रगडकर, रँग्लर जी.एस. महाजनी, डॉ. नरेंद्र दाभोलकर, मेजर जनरल एच.एम. मोहिते, तसेच एलआयसीचे संस्थापक व्ही.जी. चिरमुले आदींचा समावेश.

 “दर्जेदार शिक्षण, अनुशासन आणि संस्कारांचा वारसा लाभलेल्या या ऐतिहासिक शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा, जेणेकरून ते समाजाभिमुख नागरिक म्हणून घडतील.”— सुरेश बोतालजी, ज्येष्ठ पत्रकार व संस्थापक/अध्यक्ष, लोक पँथर