कोरेगाव नगरपंचायत समिती अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा ठराव मंजूर; समाजबांधवांत आनंदाचे वातावरण
आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला गती मिळणार
21 December, 2025
कोरेगाव:दि.२१(जरंडेश्वर समाचार)साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा कोरेगाव शहरात उभारण्याच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीला अखेर यश आले आहे. कोरेगाव नगरपंचायतीने यासंदर्भातील ठराव नुकताच मंजूर केल्याने पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून, अण्णाभाऊ साठे नगरसह संपूर्ण मातंग समाजात समाधानाचे वातावरण आहे.
कोरेगाव नगरपंचायतीचा कारभार आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या ऐतिहासिक निर्णयासाठी नगराध्यक्ष दिपाली बर्गे, उपनगराध्यक्ष राहूल बर्गे व सर्व नगरसेवकांनी सकारात्मक भूमिका घेतली. आता या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून प्रशासकीय व आर्थिक ताकद द्यावी, अशी भावना समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे.
जागेसाठी 'जिल्हा परिषद बांधकाम विभाग' अग्रक्रमी
पुतळा उभारणीसाठी जागेचे दोन ते तीन पर्याय समोर आहेत. कोरेगाव येथील जुन्या एसटी स्टॅँड परिसरातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाची जागा हा सर्वात योग्य पर्याय मानला जात आहे. बांधकाम विभागाचे कार्यालय नूतन पंचायत समिती इमारतीत स्थलांतरित होणार असल्याने, ही मोकळी जागा नगरपंचायतीने संपादन (Acquire) करावी आणि त्या ठिकाणी भव्य पुतळा उभारावा, अशी मागणी समाजाच्या वतीने आमदार शिंदे यांच्याकडे करीत आहोत.
पुतळा उभारणीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी व जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मातंग समाजाच्या वतीने लवकरच आमदार महेश शिंदे यांना अधिकृत निवेदन दिले जाणार आहे. या प्रक्रियेसाठी पत्रकार सुरेश बोतालजी सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
"निधी मिळाल्यानंतर होणार भव्य सत्कार"
पुतळा उभारणीसाठी शासन स्तरावरून निधी मंजूर होऊन अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, आमदार महेश शिंदे यांचा कोरेगाव शहरात मातंग समाजाच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पुतळा समितीचे संस्थापक सुरेश बोतालजी यांनी दिली आहे.
प्रेरणादायी स्मारक ठरेल!
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे शोषित आणि कष्टकरी समाजाचा बुलंद आवाज होते. त्यांचे साहित्य आणि विचार आजही समाजाला अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा देतात. कोरेगावात उभारले जाणारे त्यांचे स्मारक शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे आणि पुढील पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल. असा विश्वास लोक पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बोतालजी यांनी व्यक्त केला आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय