मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या भूमिकेचे कौतुक; संस्थापक अमर गायकवाड व सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमाची शहरात चर्चा
आज अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा अनावरण;साताऱ्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात उभा; प्रशासकीय इच्छाशक्ती आणि कार्यकर्त्यांच्या संघर्षाचे फळ
15 May, 2026
सातारा | जरंडेश्वर समाचार वृत्तसेवा :
साहित्य, समाजकारण आणि लोकशाहीर परंपरेतील देदीप्यमान तारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आज सातारा शहरात अनावरणासाठी सज्ज झाला आहे. हा ऐतिहासिक सोहळा पार पडत असतानाच, या स्मारकाच्या उभारणीत प्रशासनाने दाखवलेली तत्परता आणि सुरुवातीच्या काळात सामाजिक कार्यकर्त्यांनी सोसलेला राजकीय संघर्ष, अशा दोन्ही बाजूंची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
प्रशासकीय पाठबळ आणि बापटांची भूमिका
हा प्रकल्प मार्गी लागण्यामागे सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भक्कम इच्छाशक्ती कारणीभूत असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. निधीची तरतूद आणि तांत्रिक अडथळे दूर करण्यात बापट यांनी विशेष रस घेतल्यामुळेच हा पुतळा प्रत्यक्षात उभा राहू शकला. "निवडून आलेली सत्ता असती तर कदाचित राजकीय समीकरणांत हा विषय रेंगाळला असता," असे मत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या प्रामाणिक कार्याबद्दल प्रशासनाचा आणि बापट यांचा जाहीर सत्कार व्हावा, अशी मागणी मातंग व आंबेडकरी समाजातून जोर धरत आहे.
पाया रचणाऱ्या कार्यकर्त्यांचा संघर्ष
पुतळ्याच्या आजच्या भव्य स्वरूपामागे अनेक वर्षांचा संघर्ष आणि त्याग दडला आहे. या स्मारकाचे खरे 'फाउंडर' म्हणून माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते अमर गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून केला जात आहे. सुरुवातीच्या काळात या ठिकाणी अर्धपुतळा उभारण्यात आला होता, ज्याचा विस्तार करून आज पूर्णाकृती पुतळा उभा राहिला आहे.
मात्र, हा प्रवास सोपा नव्हता. अमर गायकवाड यांना हा पुतळा उभारण्यासाठी मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागल्याची चर्चा आहे. तत्कालीन राजकीय परिस्थितीत काही घटकांचा या स्मारकास छुपेपणाने विरोध होता, तरीही गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हा लढा सुरू ठेवला. त्यांच्या या निष्ठेमुळेच साताऱ्याच्या वैभवात आज ही भर पडली आहे.
महत्त्वाचे योगदान:
किशोर गालफाडे: पुतळा उभारणीच्या प्रक्रियेत त्यांचे १००% योगदान आणि सक्रिय सहभाग राहिला आहे.
सुरेश बोतालजी: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून त्यांनी प्रशासनाकडे निवेदने दिले होते. त्यावेळी बोतालजी यांच्या सोबत सागर भिसे,,व इतर मान्यवर होते.
अमर गायकवाड व सहकारी: राजकीय विरोध पत्करून पुतळ्याचा पाया रचणारे आणि प्रक्रियेला गती देणारे मुख्य दुवा.
साताऱ्याच्या अस्मितेचा उत्सव
केवळ एक स्मारक म्हणून नव्हे, तर वंचित समाजाची अस्मिता आणि साहित्याचा वारसा म्हणून याकडे पाहिले जात आहे. श्रेयवादाच्या लढाईत ज्यांनी पडद्यामागे राहून प्रामाणिक काम केले, अशा कार्यकर्त्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे मत साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. आजचा हा अनावरण सोहळा म्हणजे संघर्षातून मिळालेला सामाजिक न्यायाचा विजय मानला जात आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय