कोरेगाव–खटावच्या जलसिंचन इतिहासात नवा अध्याय
जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणासाठी निविदा जाहीर; आमदार महेश शिंदे यांचा सरकारला आभारप्रदर्शन
06 January, 2026
कोरेगाव दि.६ | (जरंडेश्वर समाचार) : दुष्काळाच्या छायेत वर्षानुवर्षे जगणाऱ्या कोरेगाव आणि खटाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या विस्तारित कामांना मंजुरी देऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि आमदार महेश शिंदे यांनी साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शिंदे म्हणाले, “या निर्णयामुळे कोरेगाव–खटावच्या जलसिंचन इतिहासात खऱ्या अर्थाने मैलाचा दगड रोवला गेला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्र्यांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.”
ऐतिहासिक नामकरण — जलसुरक्षेला बळ
या योजनेला ‘गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजना’ असे नाव देण्यात आले आहे.
नामकरणासह प्रकल्पाला गती मिळाल्याने कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या जलसुरक्षेला मजबूत आधार मिळत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
२.१५ टीएमसी अतिरिक्त पाणी — वंचित गावांना दिलासा
दीर्घ पाठपुराव्यानंतर या योजनेतून २.१५ टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.
यामुळे कोरेगाव, खटाव आणि सातारा तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना कायमस्वरूपी लाभ मिळणार आहे.
मूळ प्रकल्प खटाव आणि माणपुरता मर्यादित असल्याने अनेक गावे यापासून वंचित होती. २०१४ पासून सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विस्तारीकरण शक्य झाले.
रामोशीवाडी ते भाडळे — सिंचनाचा अखंड पट्टा
विस्तारीकरणानंतर पाणी रामोशीवाडीपासून सीधे भाडळे तलावापर्यंत पोहोचेल आणि तेथून पुढे तलावांच्या साखळीद्वारे परिसरात वितरित होईल.
या योजनेतून रामोशीवाडी, भंडारमाची, रुई, शेंदुरजणे, आझादपूर, भाडळे, हिवरे, अंबवडे, खडखडवाडी आदी अनेक गावांना थेट फायदा होणार आहे.
पाण्याचा दुहेरी उपयोग — अपव्ययाला आळा
कृष्णा नदीतून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी डोंगरमाथ्यावर साठवले जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात अपव्यय थांबेल.
वांगणा उपसा योजनेतील २.४३ टीएमसी पाणी पूर्ण क्षमतेने वापरता येईल आणि धोम डावा कालव्यावरील ताणही कमी होईल.
सेकंडरी सिंचनात १५ एकरांना एक ‘टी’ (चेंबर) देण्यात येणार असून दाबाने पाणी मिळेल. त्यामुळे ऊस, भाजीपाला, फळबागा व नगदी पिकांचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे.
खटाव-साताऱ्यालाही थेट फायदा
उजवा कॅनॉल रामोशीवाडीपासून अंभेरीपर्यंत जात असून मार्गातील अनेक गावे सिंचनाखाली येतील.
तासगाव उपसा योजनेद्वारे तासगाव—देगाव—कारंडवाडीपर्यंत पाणी उपलब्ध होणार आहे.
नद्या बारमाही — भूजलपातळीत वाढ
या प्रकल्पामुळे वसना, वांगणा, तीळगंगा, येरळा यांसारख्या नद्यांमध्ये वर्षभर प्रवाह राहील.
भाडळे तलावात पाणी साठल्यानंतर परिसरातील भूजलपातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चौकट
“मुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्द पाळला; आता स्वप्न साकार” — आमदार शिंदे
२०१४ मध्ये जाखनगाव येथे झालेल्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेद्वारे कोरेगाव-खटावचा पाणीप्रश्न सोडवू असा शब्द दिला होता. त्यानंतर सत्तांतर झाले, तरी महायुती सरकार आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी आणि सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन कामाला गती दिली.
“दूरदृष्टीपूर्ण नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे आज ठोस फलित दिसत आहे. कोरेगाव-खटावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवू शकलो, हा माझ्यासाठी मोठा समाधानाचा क्षण आहे,” असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय