कोरेगाव येथे पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम
कोरेगाव सुभाष नगर परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवले अनेकांचे धाबे दणाणले
20 February, 2025
कोरेगाव : कोरेगाव सुभाष नगर रहिमतपूर मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम नगरपंचायत आणि पोलीस दलाने संयुक्तपणे गुरूवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केली. या मोहिमेमुळे फेरीवाल्यांसह व्यापारी आणि व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या नेतृत्वाखाली विनायक पडवळ, शेखर बर्गे, अशोक बर्गे यांच्यासह नगरपंचायतीच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाली होते. मोठ्या प्रमाणावर पोलीस फौज फाटा तैनात ठेवण्यात आला होता.
कोरेगाव,दि. मॉडर्न हायस्कूल समोरील व परिसरातील तसेच नविन प्रांत कार्यालय समोरील फळांचे गाडे, दुकानाचे शेड हटविण्यात आले. फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करून ते नगरपंचायतीच्या ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आले. रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने लावलेले फलक, जाहिरात फलक आणि साहित्य उचलून नेण्यात आले. बहुतांशी ठिकाणी वादावादीचे प्रसंग उद्भवले. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ व मुख्याधिकारी विनोद जळक हे फेरीवाल्यांची समजूत घालून त्यांना नियम व अटींची माहिती देत होते.अतिक्रमण आढळल्यास कारवाई होणारच , कोरेगाव शहरातील रस्त्यांवरील पूर्णपणे बेकायदेशीर नगर पंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामे,पत्र्याचे शेड हटविण्यात येणार विनाकारण कोणी वाद विवाद करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे,महामार्गावर आणि राज्य मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.मोठया प्रमाणावर अपघात घडत आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्याचे उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. आज सुद्धा व्यावसायिकांना समज देण्यात आली आहे, मात्र यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग आणि खंडाळा शिरोळ राज्य मार्गावर, कोरेगाव रहिमतपूर विटा रस्त्यावर अतिक्रमण होऊ देणार नाही. अतिक्रमण केल्याचे आढळल्यास कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले.