single-post

झेडपी शिक्षण विभागात लाचखोरीचा पर्दाफाश : महिला लिपिक २५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

शिक्षण अधिकारी यांच्यावर कारवाई करा -सुरेश बोतालजी

29 October, 2025

सातारा, दि.२८ प्रतिनिधी : सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील महिला लिपिकाला २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, प्रशासनातील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली शंकर माने (वय ४०, रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) असे आरोपी महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार हे निवृत्त शिक्षक असून त्यांच्या निवड श्रेणीच्या प्रस्तावास मान्यता मिळवून देण्यासाठी आरोपीने २५ हजार रुपयांची मागणी केली होती.

‘साहेबांना पैसे द्यायचे आहेत’ म्हणत मागितली लाच,तक्रारदारांनी प्रस्तावासंबंधी विचारणा केली असता माने यांनी “साहेबांना देण्यासाठी पैसे लागतात” असे सांगून लाचेची मागणी केल्याचे एसीबीने सांगितले. तक्रारीनंतर एसीबीने पडताळणी केली असता मागणी खरी असल्याचे निष्पन्न झाले. २८ ऑक्टोबर रोजी सापळा रचून एसीबीने माने यांना २५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि प्रवीण निंबाळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

“तो साहेब कोण?” — पुढील तपासाची उत्सुकता

लाच घेताना माने यांनी “हे पैसे साहेबांना देण्यासाठी आहेत” असे सांगितल्याने “तो साहेब कोण?” या प्रश्नावर आता शिक्षण विभागात चर्चा रंगली आहे. एसीबीचा तपास या दिशेने सुरू असून, आणखी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का याबाबत चौकशी सुरू आहे.

शिक्षण विभागात ‘पैसा बोलतो’ संस्कृती? या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता, वेतन बिले, वरिष्ठ व निवड श्रेणी मंजुरी, फरक बिले, वैद्यकीय बिले आदी कामांसाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून होत आहेत.

“कामे पैसे दिल्याशिवाय पुढे सरकत नाहीत. कागदपत्रांमध्ये मुद्दाम त्रुटी दाखवून हेलपाटे मारायला लावले जाते,” असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. “पैसा बोलतो” अशीच चर्चा आता विभागात सुरू आहे.

‘आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय’ — मनमानी कारभारावर टीका

माध्यमिक शिक्षण विभागात काही कर्मचाऱ्यांकडून गोड बोलून वेळकाढूपणा, दबाव निर्माण करून फायली थांबवण्याची पद्धत असल्याचा आरोप आहे. “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” अशीच परिस्थिती विभागात निर्माण झाली असल्याचे शिक्षकवर्तुळात बोलले जात आहे.

सातारा जिल्हा शैक्षणिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या अग्रगण्य असताना अशा प्रकारांनी जिल्हा परिषदेच्या प्रतिष्ठेला गालबोट लागल्याचे समाजातील जाणकारांचे मत आहे.

 शिक्षणाधिकारी चोपडे यांच्या वर कारवाई करा, अन्यथा आंदोलन’ — सुरेश बोतालजी

या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरेश बोतालजी यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की,

 “शिक्षण विभागात भ्रष्टाचार खुलेआम सुरू आहे. महिला लिपिक पकडली गेली, यावरून हे शिक्षण विभागात अनेक वर्षापासून मोठा भ्रष्टाचार आहे हे यावरून स्पष्ट होत आहे,  जिल्हा परिषदेमधील शिक्षणाधिकारी चोपडे यांची तात्काळ बदली करा किंवा कारवाई करा. अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन छेडणार आहोत.”बोतालजी यांनी पुढे सांगितले की, “शिक्षण विभागातील कारभार पारदर्शक होण्यासाठी एसीबीसह जिल्हा प्रशासनाने विशेष तपास मोहीम राबवावी. प्रत्येक शिक्षकाचा विश्वास परत मिळवणे ही आता जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे.”

एसीबीचे आवाहन,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी लाच मागत असल्यास १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा.