single-post

सरकार–पोलीस–राजकारणी यांच्या अभद्र युतीविरोधात संविधान संघर्ष मोर्चाचा संतप्त आवाज!

डॉ. संपदा मुंडे प्रकरणी एसआयटी चौकशी व जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

27 October, 2025

सातारा, दि. २७ ` ऑक्टोबर : (जरंडेश्वर समाचार)राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेले अन्याय, अत्याचार, खून, बलात्कार, जातीय अत्याचार या पार्श्वभूमीवर शासन, पोलीस आणि राजकारणी यांच्या अभद्र युतीविरुद्ध संविधान संघर्ष मोर्चाने संतप्त भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनातून मोर्चाने स्पष्टपणे म्हटले आहे की, राज्यातील शासनयंत्रणा संवेदनाशून्य झाली असून, महिला आणि वंचित घटकांवरील अत्याचाराला सरकारी पाठबळ मिळत आहे.

मोर्चाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सासपडे येथील अल्पवयीन मुलीचा खून असो वा फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केले जाण्याचे प्रकरण, पुण्यातील दिवाळी साजरी करणाऱ्या मागासवर्गीय व्यक्तींचा खून असो की सोनई येथील मातंग युवकावर झालेली अमानुष मारहाण — या सर्व घटनांमध्ये राजकीय हस्तक्षेप आणि पोलिसांचे दुहेरी धोरण ठळकपणे दिसून येते.

सातारामध्येच दस्तगिर नगरातील दहा वर्षांच्या शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आणि संबंधित आरोपीला पोलीस अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्याचे गंभीर आरोप मोर्चाने केले. या सर्व घटनांकडे शासन व गृहविभागाने डोळेझाक केली असल्याचे मोर्चाचे म्हणणे आहे.

मोर्चाच्या प्रतिनिधींनी निवेदनात म्हटले आहे की, “राज्यातील पोलिस प्रशासन व गृहविभाग हे सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचत आहेत. न्यायव्यवस्था आणि संविधान यांची खिल्ली उडवली जात आहे. विकलेली मीडिया हे सत्य जनतेसमोर आणत नाही. त्यामुळे आज वंचित, दलित, महिला वर्ग न्यायासाठी हतबल झाला आहे.”

मोर्चाने पुढे मागणी केली की, राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, तसेच महिला आयोग आणि राज्य अनु.जाती-जमाती आयोगावर पक्षविरहित व्यक्तींची नियुक्ती करावी. डॉ. संपदा मुंडे प्रकरणी स्वतंत्र एसआयटी नियुक्त करून सखोल चौकशी व्हावी, तसेच प्रकरणातील जबाबदार पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना तडकाफडकी निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली.

त्याचप्रमाणे दस्तगिर कॉलनीतील प्रकरणात आरोपीला पाठीशी घालणाऱ्या शाहुपुरी पोलिस चौकीच्या तपासी अधिकाऱ्याला बडतर्फ करावे, महिला व अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणे फास्टट्रॅक न्यायालयात चालवावीत, अॅट्रॉसिटी कायद्यान्वये दाखल प्रकरणांतील आरोपींना तात्काळ अटक करून न्यायालयात हजर करावे, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या धर्मांध संघटनेवर बंदी घालावी, अशा मागण्या संविधान संघर्ष मोर्चाने केल्या.

या निवेदनावेळी संविधान संघर्ष मोर्चाचे जिल्हा समन्वयकगणेश वाघमारे, अनिल बडेकर, गौरी आवळे, दिपक गाडे, शाहीर फरांदे, सुरेश कोरडे, प्रमोद क्षीरसागर, सश आदींनी सहभाग नोंदवून घोषणाबाजी केली. सादिक शेख, गणेश भिसे, भारत लोकरे, युवराज कांबळे, वैभव गायकवाड, सतीश गाडे, प्रशांत जगताप, अशोकी गायकवाड, विशाल भोसले, संदिप जाधव, किरण बगाडे, अझर मणेर, रजिया शेख, कलिमून शेख, रुक्सर तहसीलदार, सोमय्या कोरभू, सायली भोसले, सुनंदा मोरे, किशोर धुमाळ, लक्ष्मी कांबळे, रमेश उबाळे ,संजय गाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.शासनाने तात्काळ ठोस कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.