single-post

कोरेगावात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपंचायतीचे दुर्लक्ष!

नगरपंचायतीने तात्काळ कारवाई करावी – नागरिकांची मागणी

10 December, 2025


कोरेगाव दि.१०(जरंडेश्वर समाचार) : शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत. शाळेत जाणारी मुले, वयोवृद्ध, महिला यांच्यावर कुत्री धावून जाण्याच्या घटना वाढल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत कोरेगाव शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, नगरपंचायतीच्या ढिम्म भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, उमाजी नाईक नगर, अण्णाभाऊ साठे नगर, गोसावी वस्ती, आरफळ कॉलनी, तसेच मारुती मंदिर मागील भाग, बोबडे दुकान मार्ग, जनावरांचा दवाखाना परिसर, दादा पवार सलून समोर या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या सर्वाधिक असून, प्रत्येक ठिकाणी जवळपास दहा-दहा कुत्र्यांची टोळकी दिवसरात्र नागरिकांना त्रास देताना दिसतात.

माँडन हायस्कूल रस्ता, आझाद चौक ते बाजार मैदान मार्ग या मुख्य रस्त्यांवरून शाळकरी मुलांचा मोठा वावर असतानाही प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केलेली नाही. अनेक मुलांवर कुत्र्यांनी धाव घेण्याच्या घटना घडल्या असून काही नागरिकांना चावा लागल्याचेही समोर आले आहे.

मटन मार्केट ‘हॉटस्पॉट’ – कचऱ्याकडे कुत्र्यांची धाव

कोरेगाव बाजारपेठेतील मटन मार्केट परिसरात कुत्र्यांचा सर्वाधिक वावर आढळतो. मटन–चिकनचा कचरा रस्त्यावरच फेकला जात असल्याने कुत्र्यांचा मोठा जमाव येथे दिसून येतो. मांसाचे तुकडे खाताना कुत्री अधिक आक्रमक होतात आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांवर धाव घेतात, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.

मटन मार्केटमधील कचरा उचलण्यासाठी नगरपंचायतीची घंटागाडी उपलब्ध करून देणे, तसेच कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या दुकानांवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानीक नागरिकांचा संताप : ६ महिन्यांपासून अर्ज, तरीही कारवाई शून्य

नागरिकांनी यापूर्वीच नगरपंचायतीकडे निर्बिजीकरणासाठी लेखी अर्ज सादर केला होता. मात्र, सहा महिने उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

शहरात निर्बंध नसल्याने काही लोकांनी दोन–चार कुत्री पाळून मोकाट सोडण्याचाही प्रकार वाढला आहे. त्यामुळे इतर नागरिकांमध्ये वाद–भांडणे होण्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत.

नवीन कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना खायला घालणे गुन्हा मानला जात असूनही काही ठिकाणी नागरिक कुत्र्यांना अन्न देत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यावरदेखील नियंत्रणाची गरज आहे, असे नागरिकांचे मत आहे.

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

गेल्या दोन दिवसांपासून कोरेगावातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून,

“नगरपंचायतीचे अधिकारी नेमके काय पाहत आहेत?”,“दखल कधी घेणार?”अशा स्वरूपाचे प्रश्न नागरिकांकडून सातत्याने उपस्थित केले जात आहेत.

मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांनी तातडीने हस्तक्षेप करावा – नागरिकांची मागणी,या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव शहरातील नागरिक, पालक व स्थानिक सामाजिक संघटनांची मागणी अशी आहे की—नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष  यांनी तात्काळ परिस्थितीची पाहणी करावी, भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण युद्धपातळीवर सुरू करावे, मटन मार्केट परिसरातील कचरा व्यवस्थापन सुधारावे,मोकाट पाळीव कुत्र्यांवर नियंत्रक कारवाई करावी,शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात नागरिकांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा   जनतेने दिलाआहे.