अतिवृष्टीग्रस्तांसाठी सरकारचे फसवे पॅकेज! – आ. शशिकांत शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून दिवाळीच्या दिवशी राज्यभर ठिय्या आंदोलन;सरसकट कर्जमाफी व हेक्टरी ५० हजार मदतीची मागणी; सरकारविरोधात संतापाचा ज्वालामुखी
17 October, 2025
सातारा, दि. १७(जरंडेश्वर समाचार) : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले मदत पॅकेज हे ‘फसवे’ असून, शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक करणारे असल्याचा आरोप आ. शशिकांतजी शिंदे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)तर्फे आज दिवाळीच्या दिवशी राज्यभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही भव्य आंदोलन करून शासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “सरसकट कर्जमाफी करा”, “हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या”, “शेतकऱ्यांवर अन्याय बंद करा” अशा घोषणा देत संताप व्यक्त केला.
अतिवृष्टीमुळे ६० लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त; सरकारचे पॅकेज केवळ कागदावर,गेल्या महिन्यातील अतिवृष्टीने राज्यभरातील सुमारे ६० लाख हेक्टर शेतीचे नुकसान केले. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली, जनावरे मृत्युमुखी पडली, घरदार उद्ध्वस्त झाली. परंतु, सरकारने जाहीर केलेले मदत पॅकेज ‘फसवे’ आणि ‘कागदोपत्री’ असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
नेत्यांच्या मते, सरकारने जाहीर केलेली मदत केवळ ७,००० ते १७,५०० रुपये प्रति हेक्टर इतकी आहे, जी खर्चाच्या तुलनेत नगण्य आहे. एका हेक्टर शेतीचा खर्च किमान ५० ते ६० हजार रुपये येतो, मग सरकारने दिलेली रक्कम कशासाठी पुरेशी ठरेल? असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला.
“शेतकऱ्यांवर अन्याय; सरकार आकडेवारीत व्यस्त, शेतकरी उपाशी”शेतकऱ्यांच्या अंगावरील संकट वाढत असताना सरकार मात्र घोषणा आणि आकडेवारीत व्यस्त असल्याची टीका करण्यात आली. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले असूनही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही.
अतिवृष्टीमुळे केवळ शेती नव्हे तर गुरेढोरे, घरे आणि साधनसामग्री वाहून गेली. तरीही शासनाने अजूनही मदतीचा ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यातच खाजगी सावकारांकडून १० ते १५ टक्के व्याजदराने वसुली सुरू असल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला आहे.
“सरकारची मदत ही विनोदासारखी” — आ. शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजच्या नावाखाली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असे आश्वासन दिले गेले होते, पण आज दिवाळी उजाडली तरी मदत कुठेच नाही. आकडेवारीचा खेळ करून सरकारने फक्त कागदावर दिलासा दाखवला आहे. आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरणारच!”
जनावरांच्या मृत्यूवरील अपुरी भरपाई; नदीकाठच्या शेतीला झटका,अतिवृष्टीत हजारो जनावरे वाहून गेली. सरकारकडून केवळ ३७,५०० रुपये मदत देण्याची घोषणा झाली असली तरी बाजारभावानुसार एका जनावराची किंमत ६० ते ७० हजार रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हानी भरून निघत नाही, हे वास्तव आहे.
त्यामुळे मृत जनावरांसाठी किमान ७० हजार रुपये, तसेच नदीकाठच्या जमिनी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी १ लाख रुपये रोख मदत देण्याची मागणी या आंदोलनात जोरदारपणे करण्यात आली.
घरकुल, फळबाग, शिक्षणक्षेत्र यांनाही न्याय द्या,अतिवृष्टीत घर कोसळलेल्या कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे देण्याची घोषणा झाली असली, तरी त्याची अंमलबजावणी कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे प्रभावित कुटुंबांना तत्काळ दीड लाख रुपये रोख मदत देण्याची मागणी करण्यात आली.
फळबागधारकांना ३२,५०० रुपयांपेक्षा जास्त नुकसानभरपाई, तसेच विद्यार्थ्यांचे परीक्षा आणि शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणीही नेत्यांनी केली. राज्यभर ठिय्या आंदोलनात उस्फूर्त प्रतिसाद ,या अनोख्या दिवाळी आंदोलनात शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
साताऱ्यातील आंदोलनाचे नेतृत्व आ. शशिकांत शिंदे यांनी केले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील भैया माने, मानसिंगराव जगदाळे, देवराज दादा पाटील, अभयसिंह जगताप, सतीश चव्हाण, अर्चनाताई देशमुख, मेघाताई नलावडे, वैशाली जाधव, गिरीश फडतरे, युवराज पवार, राजाभाऊ जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या आंदोलनाचे संयोजन प्रज्ञा गायकवाड आणि राजाभाऊ काळे यांनी केले. शेतकऱ्यांची दिवाळी काळोखीच! अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर सरकारच्या फसव्या पॅकेजने मीठ चोळले आहे. दिवाळीचा सण आनंदाचा ठरला नाही, तर तो अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा दिवस ठरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने स्पष्ट इशारा दिला आहे
“सरकार जागे झाले नाही, तर रस्त्यावरूनच उत्तर दिले जाईल!”

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय