मतदारयादी शुद्धीकरणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत : आमदार शशिकांत शिंदे
महाविकास आघाडीचा ठाम इशारा; वेळप्रसंगी निवडणुकीत विजय निश्चित
26 October, 2025
कोरेगाव दि.२५ | (जरंडेश्वर समाचार): राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत, या घोळांमुळे निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. “मतदार याद्या शुद्ध न झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, ही महाविकास आघाडीची प्रमुख मागणी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले
कोरेगावात पक्ष कार्यकर्त्यांची बैठक ,कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक रविवारी दुपारी मार्केट यार्डमधील गीताई मंगल कार्यालयात झाली. या वेळी आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी निवडणुकांची तयारी तपासली.
बैठकीस तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, ॲड. पी. सी. भोसले, अरुण माने, संचालक अमरसिंह बर्गे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मतदार याद्यांतील घोळांविरोधात राज्यव्यापी आंदोलन, आमदार शिंदे म्हणाले, “सत्ताधारी पक्ष मतदार याद्यांमध्ये फेरफार करून निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. याविरोधात महाविकास आघाडी लवकरच राज्यभर आंदोलन उभारणार आहे.”
मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर १ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
निवडणुकीसाठी सज्जता; विजयाचा आत्मविश्वास,“सत्ताधारी मंडळी कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर करू शकतात. त्यामुळे पक्षाने संपूर्ण तयारी ठेवली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ताकदीने लढवेल,” असे शिंदे म्हणाले.
सध्याच्या महायुती सरकारबद्दल जनतेत तीव्र नाराजी असून, सर्वसामान्यांवर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले. “जनतेला दिलासा देण्यासाठी निवडणुका हेच योग्य माध्यम ठरतील,” असेही त्यांनी नमूद केले.
ग्रामपातळीवर संघटन मजबूत करण्याचे आवाहन, शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत संघटना मजबूत करा. एकदिलाने, शिस्तबद्ध काम केल्यास सत्ता आपल्या हातात येईल.”
इच्छुक उमेदवारांची निवड कोअर कमिटीमार्फत केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीत विविध पदाधिकारी, स्थानिक नेते आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते. सर्वांनी पक्षाच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कोरेगाव पोलीस ठाण्यावर ३ नोव्हेंबरला मोर्चाकोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या “अविचारी आणि पक्षपाती” कारभारामुळे नागरिक त्रस्त असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला. “निरपराध कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून राजकीय कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.या विरोधात ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कोरेगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.
महायुती सरकारविरोधात जनआंदोलनाची तयारीराज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याचा आरोप करत शिंदे म्हणाले, “सातारा जिल्ह्यातील सासपडे येथील अल्पवयीन मुलीचा खून आणि फलटण येथील डॉक्टर युवतीच्या आत्महत्येसारख्या घटना सरकारच्या निष्क्रियतेचे द्योतक आहेत.”रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा योजनांतील भ्रष्टाचार आणि जनतेवरील अन्याय रोखण्यासाठी पक्ष व्यापक जनआंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय