फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक कोठडीत; प्रकरणावरून राजकीय वाद वाढला
मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ; सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आरोपीला तत्काळ निलंबित केले ;. राहुल गांधींची संतप्त प्रतिक्रिया — “सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरा देणारी घटना”
26 October, 2025
फलटण दि.२५ | (जरंडेश्वर समाचार):- फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी नवे घडामोडी घडत आहेत. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीत आणि तळहातावरील मजकूरात फलटण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि आणखी एका व्यक्तीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाळ बदने याने शनिवारी रात्री पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून, न्यायालयाने त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दुसरा संशयित प्रशांत बनकर यालाही पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आरोपी उपनिरीक्षकाला तत्काळ निलंबित केल्याची माहिती दिली. दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही घटना “सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवणारी” असल्याची तीव्र प्रतिक्रिया दिली. तर शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर आरोप केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या आरोपांना राजकीय हेतूपूर्ण म्हटले असून, “थोडीशीही शंका असती तर कार्यक्रम रद्द केला असता,” असे स्पष्ट केले. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही भावनिक प्रतिक्रिया देत “मलाही दोन मुली आहेत, अशा घाणेरड्या प्रसंगाशी माझे नाव जोडले जाणे वेदनादायक आहे,” असे सांगितले.
दरम्यान, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी राज्य सरकारवर महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर अपयश ठपक्याही ठेवल्या. या घटनेमुळे फलटणच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय