single-post

कास तलावात उद्यापासून नौकाविहार; स्थानिकांना रोजगाराची नवी संधी

पर्यटकांसाठी पर्यावरणपूरक पॅडल बोट, नियमांचे पालन आवश्यक

25 October, 2025

सातारा दि.(जरंडेश्वर समाचार) :– ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास तलावात उद्यापासून (शनिवार) पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद घेता येणार आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पामुळे शंभराहून अधिक स्थानिकांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

सातारा पालिकेने उभारलेल्या या प्रकल्पांतर्गत इंधनविरहित पर्यावरणपूरक पॅडल बोटी (सिंगल व डबल सीट) उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय झिप लाइन (रिव्हर क्रॉसिंग), कॅराव्हॅन सुविधा, तसेच आगामी काळात पॅराग्लायडिंग व पॅरामोटार यांसारख्या आकर्षक पर्यटन सुविधा सुरू करण्याचे नियोजन आहे.

पर्यटकांसाठी लाइफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक, लहान मुलांना पालकांसहच प्रवेश, तसेच प्लास्टिकच्या बाटल्या, धूम्रपान व मद्यपानास बंदी असे नियम लागू राहतील.

या उपक्रमातून गाईड, सुरक्षा रक्षक, तिकीट घर कर्मचारी आणि जीवरक्षक यांसाठी स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.

कास तलावातील हा नवा उपक्रम पर्यावरणपूरक पर्यटनास चालना देणार असून, कास परिसरातील पर्यटन अधिक आकर्षक होण्याची शक्यता आहे.