रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर संताप
रानगव्याच्या शिंगाने छातीत घाव; हल्ला इतका भीषण की प्रतिकाराचाही वेळ मिळाला नाही;मागील महिन्यात माकडाच्या झेपेत शेतकऱ्याचा मृत्यू; चाळीस दिवसांत दुसरा बळी 6. महाबळेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी मोहिते यांच्यावर कारवाईची मागणी तीव्र
25 October, 2025
महाबळेश्वर दि.२५(जरंडेश्वर समाचार): -महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या भीषण हल्ल्यात शेतकरी राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून, वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. मात्र, ते दुपारी घरी न परतल्याने काही ग्रामस्थांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांचा मृतदेह शेतात आढळला. प्राथमिक तपासानुसार रानगव्याने अचानक हल्ला करून शिंगाने छातीत भोसकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हल्ला इतका प्रचंड होता की प्रतिकार करण्यास त्यांना वेळही मिळाला नाही.
घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला.
वनविभागावर ग्रामस्थांचा संताप,या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोनाट, तापोळा आणि आंबेनळी परिसरात रानगवे व रानडुक्करांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून, शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी अनेक वेळा वनविभागाकडे लेखी तक्रारी करून गस्त वाढविणे, सापळे लावणे आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. परंतु, विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शेतकऱ्यांचा प्रश्न केवळ वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपुरता मर्यादित नसून, त्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम करणारा बनला आहे. भीतीपोटी अनेकांनी शेती करणे बंद केले आहे. तरीसुद्धा प्रशासन आणि वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांची मागणी ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, या परिसरात वनविभागाच्या गस्त पथकांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, हल्ल्यात मृत व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, तसेच रानगव्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
मागील घटनेची आठवण ताजी,फक्त चाळीस दिवसांपूर्वी, म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी, देवळी गावचे रहिवासी आनंद जाधव यांच्या दुचाकीवर माकडाने झेप घेतल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण आणखी गडद झाले आहे.
दरम्यान, महाबळेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये चर्चा सुरु असून, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
लोकांच्या जीवनरक्षणासाठी तसेच वन्यप्राण्यांच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशीही मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय