कोरेगाव महाराष्ट्रातील ‘स्मार्ट सिटी’चे उदयोन्मुख केंद्र
आमदार डॉ. महेश शिंदे यांच्या दूरदृष्टीतून कोरेगावचा कायापालट; ‘रोड स्टॅम्प काँक्रीट फूटपाथ’ प्रकल्पाने मिळणार आधुनिक रूप
10 October, 2025
. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहर सध्या विकासाच्या नव्या शिखरावर झेप घेत आहे. ज्या वेगाने कोरेगावचा कायापालट होत आहे, त्यावरून येत्या काही वर्षांत महाराष्ट्रातील सर्वात स्मार्ट शहर म्हणून कोरेगावचे नाव अग्रस्थानी राहील, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
लोकप्रिय, जनसंपर्कशील आणि दूरदर्शी आमदार डॉ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागील पाच ते सहा दशकांपासून थांबलेला विकासाचा बॅकलॉग संपवण्यात यश आले आहे. शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण, अंडरग्राउंड ड्रेनेज, आधुनिक बाजारपेठा, आकर्षक प्रशासकीय इमारती, तसेच शहर सौंदर्यीकरणाच्या कामांमुळे कोरेगावचे रूप पूर्णतः बदलले आहे.
आधुनिकतेकडे वाटचाल : ‘व्हाईट हाऊस भाजी मंडई’ ठरते आकर्षण
कोरेगाव शहरातील आझाद चौक, प्रशासकीय संकुल आणि नव्याने बांधलेली भाजी मंडई या कामांमुळे शहराला एक आधुनिक आणि आकर्षक ओळख मिळाली आहे.
विशेष म्हणजे, या भाजी मंडईला दिलेल्या आकर्षक डिझाईनमुळे नागरिक तिला आता प्रेमाने “व्हाईट हाऊस भाजी मंडई” असे संबोधतात. अमेरिकेतील प्रसिद्ध ‘व्हाईट हाऊस’ची झलक देणारी ही वास्तू कोरेगाव शहराचे नवे प्रतीक ठरू लागली आहे.
शहरातील रेस्ट हाऊस, बस स्टॉप आणि इतर सार्वजनिक स्थळांचे आधुनिकीकरण झाल्याने कोरेगाव तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील विकासाची गती राज्यात आदर्श ठरत आहे.
एकंबे रस्ता परिसरात रोड स्टॅम्प काँक्रीट फूटपाथ
एकंबे रस्ता परिसरात नुकतेच ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करण्यात आले असून, या भागात नवीन रहिवासी वसाहती मोठ्या प्रमाणात उभ्या राहत आहेत. सकाळी मॉर्निंग वॉक आणि सायंकाळी इव्हिनिंग वॉकसाठी महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या रस्त्यावर येतात.
ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्षा दीपाली बर्गे आणि माजी नगरसेवक महेश बर्गे यांनी आमदार डॉ. महेश शिंदे यांच्याकडे फूटपाथ बांधणीची मागणी केली होती. त्यांच्या पुढाकाराने आमदार शिंदे यांनी नगरपंचायतीला रोड स्टॅम्प काँक्रीट फूटपाथ बांधण्याचे निर्देश दिले आहेत.
हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प ठरत असून, पादचाऱ्यांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या फूटपाथवर चालताना नागरिकांना व्यायामाचा अनुभव मिळणार असून, वाहन वाहतुकीपासून सुरक्षित अंतर राखले जाईल. परिणामी अपघातांचे प्रमाणही घटेल.
पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा आदर्श
एकंबे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. हिरवाईमुळे परिसराला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले असून, पर्यावरणीय समतोल राखला जात आहे. नागरिकांना ताजेतवाने व आरोग्यदायी वातावरण मिळत आहे.
मेनरोडवरील वाहतूक कोंडीवर उपाय : फूटपाथ आणि उड्डाणपूलची मागणी
कोरेगाव शहरातून जाणारा सातारा–लातूर राष्ट्रीय महामार्ग (मेन रोड) हा शहराचा मुख्य मार्ग आहे. परंतु रस्त्याची रुंदी अपुरी असल्याने येथे वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. अनेकदा पाच ते सहा तास वाहने अडकून पडतात. नागरिकांना तर कधी कधी “आपण पुणे–चाकण महामार्गावर आलो आहोत की काय?” असा प्रश्न पडतो.
या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नागरिकांनी मार्केट यार्ड ते सरस्वती विद्यालय या दरम्यान उड्डाणपूल (फ्लायओव्हर) बांधण्याची मागणी केली आहे. यामुळे वाहतूक सुलभ होईल आणि शहरातील जामची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल.
दरम्यान, या रस्त्यावर विद्यानगर ते मार्केट यार्ड दरम्यान दोन्ही बाजूंना रोड स्टॅम्प काँक्रीट फूटपाथ उभारले जाणार आहेत. यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुरक्षित जागा मिळेल आणि शहराचे सौंदर्य आणखी खुलून दिसेल.
आमदार डॉ. शिंदे यांनी व्यापारी व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, अधिक रुंद, आधुनिक आणि टिकाऊ फूटपाथ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कोरेगाव राज्यात आघाडीवर
2019 पासून आमदारकीची सूत्रे हाती घेतल्यानंतर, डॉ. महेश शिंदे यांनी कोरेगाव शहर आणि मतदारसंघात शाश्वत, आधुनिक आणि पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य दिले आहे.
परदेशातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांनी रस्ते, नाले, जलनिस्सारण, सार्वजनिक ठिकाणे आणि प्रशासकीय इमारती यांचे आधुनिकीकरण केले आहे.
त्यांच्या प्रयत्नांमुळे आज कोरेगाव हे “विकासाचे प्रयोगशाळा शहर” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
कोरेगावकडे राज्याचे लक्ष
आज कोरेगाव शहर केवळ साताऱ्याचे नव्हे, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे आदर्श विकास मॉडेल ठरत आहे.
“स्मार्ट कोरेगाव – सुंदर कोरेगाव – सुरक्षित कोरेगाव” या संकल्पनेतून सुरू असलेला विकासप्रवास, येत्या काळात कोरेगावला महाराष्ट्रातील सर्वोत्तम स्मार्ट सिटींपैकी एक म्हणून स्थान मिळवून देईल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
—सुरेश बोतालजी संपादक
मो-९१ १२ ६५० ६५०

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय