single-post

सातारा नगरपरिषदेच्या निवडणुकीला चार आघाड्यांची रंगत

उदयनराजे–शिवेंद्रराजे यांच्याबरोबर तिसरी आणि चौथी आघाडीचेही आव्हान

10 October, 2025

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचे नगारे वाजताच शहरातील राजकारण पुन्हा तापले आहे. पारंपरिक दोन राजघराण्यांच्या — उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले — यांच्या गोटांव्यतिरिक्त आता “तिसरी आघाडी” आणि “चौथी बहुजन आघाडी” मैदानात उतरण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक चौकोनी लढतीकडे झुकतेय, अशी चर्चा नागरीकांच्यात रंगू लागली आहे.

 तिसरी आघाडी केंद्रस्थानी

नगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणानंतर शहरात नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यंदा दोन्ही राजे एकत्र येणार की आमनेसामने उभे राहणार, या प्रश्नांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नव्या “तिसऱ्या आघाडी”ची चर्चा जोर धरू लागली आहे.

शिंदे यांच्या सक्रियतेमुळे असंतुष्ट कार्यकर्ते आणि तरुण वर्ग नव्या संघटनेभोवती एकवटत आहेत. त्यामुळे साताऱ्यात “नव्या राजकीय समीकरणांची बीजे” पडत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे.

 जनतेचा कल तिसऱ्या आघाडीकडे?

शहरातील मतदारवर्गात सध्या चर्चेचा एकच विषय — “या वेळी राजेपैकी नव्हे, तर तिसऱ्या आघाडीचा नगराध्यक्ष दिसेल का?”

गेल्या काही वर्षांत विकासकामे झाली असली तरी अनेक प्रकल्प अधांतरी राहिल्याने मतदारवर्गात नाराजी आहे. त्यामुळे पारंपरिक राजकीय संघर्षांपासून कंटाळलेल्या मतदारांचा कल नव्या आघाडींकडे झुकताना दिसतो आहे.

तरुणाईचा उत्साह — नव्या चेहऱ्यांचा ओघ

हद्दवाढीनंतर नव्याने विकसित झालेल्या साताऱ्यात तरुणांना नवे नेतृत्व हवे आहे, असा स्पष्ट संदेश नागरिकांकडून दिला जात आहे. “तरुणाईचा आवाज नगरभवनात पोहोचवणार” या घोषणेसह अनेक तरुण नव्या नेतृत्वाभोवती एकवटत आहेत.

शशिकांत शिंदे यांच्या गोटात या तरुण पिढीचा ओघ वाढत असल्याचे स्पष्ट दिसते.

 राजे की जनता — निर्णयाचा धागा लोकांच्या हातात

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचा प्रभाव निर्विवाद असला तरी यंदा जनतेच्या मनात “बदलाची चाहूल” आहे.

शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले,

> “राजेंचे योगदान मान्यच, पण आता नगरभवनात तरुण नेतृत्व पाहायचे आहे. नवीन सातारा, नवतरुण युवकांच्या हातात हवा.”

राजकीय जाणकारांच्या मते, जर तिसऱ्या आघाडीचा उमेदवार सर्वसमावेशक नेतृत्व दाखवू शकला, तर नगराध्यक्षपदावर तिसऱ्या आघाडीचा विजय शक्यतेच्या कक्षेत आहे.

 बहुजन आघाडीची एंट्री — चौथ्या समीकरणाची चर्चा जोमात

साताऱ्यात अलीकडेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात झालेल्या बैठकीत विविध आंबेडकरी आणि बहुजन संघटनांचे नेते एकत्र आले. या बैठकीत “बहुजन सत्तेचा झेंडा नगरभवनावर फडकवू” या निर्धाराने चौथी राजकीय आघाडी उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत सहभागी नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे गणेश भिसे, आरपीआय (आठवले गट)चे अशोक गायकवाड, बहुजन समाज पार्टीचे जगताप, आरपीआय (गवई गट)चे संजय गाडे, आरपीआय (कवाडे गट)चे युवराज कांबळे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे डॉ. सुरेश माने, जनता क्रांती दिनचे सत्यवान कमाने, दलित महासंघाचे प्रतिनिधी, राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉ. साठे आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर समर्थक आदींचा समावेश होता.

 “सत्ता हवी — विकासासाठी नव्हे, न्यायासाठी!”

या बैठकीत अनेक नेत्यांनी एकमुखाने ठाम भूमिका घेतली 

> “सत्तेशिवाय विकास शक्य नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे सत्तेची चावी आपल्या हातात घेतल्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही.”

नेत्यांनी आवाहन केले की आर्थिक प्रलोभने, राजकीय दबाव किंवा आमिषाला बळी न पडता यावेळी बहुजन समाजाने “स्वतःची सत्ता, स्वतःचा नगराध्यक्ष” या ध्येयाने एकत्र यावे.

 चौथ्या आघाडीचे वाढते महत्त्व

परंपरेने साताऱ्याचे राजकारण दोन राजघराण्यांच्या गोटांभोवती फिरत आले आहे; परंतु आता तिसऱ्या आणि चौथ्या आघाडींच्या प्रवेशामुळे निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे.

शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडी आधीच चर्चेत असताना, नव्याने उभी राहणारी बहुजन आघाडी शहरातील दलित, वंचित आणि अल्पसंख्याक मतांवर निर्णायक प्रभाव टाकू शकते, असे जाणकारांचे मत आहे.

 मतदारवर्गाचा कल — बदलाच्या दिशेने?

विकासकामे अर्धवट राहिल्याने आणि पारंपरिक वादामुळे मतदार नव्या पर्यायांकडे वळताना दिसत आहेत.

एका ज्येष्ठ नागरिकाचे मत विशेष लक्षवेधी आहे —

> “राजेंचे योगदान नाकारता येत नाही, पण आता बदल हवा आहे. बहुजन सत्तेचा विचार शहरात नव्या उमेदीचा श्वास आणतोय.”

 अंतिम संघर्ष — त्रिकोणी की चौकोनी?

साताऱ्याची नगरपरिषदेची निवडणूक यंदा केवळ दोन राजघराण्यांत सीमित न राहता चार आघाड्यांमध्ये रंगणार आहे —

1. उदयनराजे गट

2. शिवेंद्रराजे गट

3. शशिकांत शिंदे यांची तिसरी आघाडी

4. बहुजन चौथी आघाडी

 “नगरभवनावर कोणाचा झेंडा फडकणार?”

या प्रश्नाचे उत्तर येत्या काही दिवसांत मतदार ठरवतील.

नव्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याची निवडणूक अधिक चुरशीची, अधिक रंगतदार आणि निर्णायक ठरणार आहे.

सुरेश बोतालजी, संपादक मो-९१ १२ ६५० ६५०