फेब्रु-मार्च २०२६ : दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकावर शिक्कामोर्तब
राज्य मंडळाने जाहीर केले आगाऊ वेळापत्रक; विद्यार्थ्यांना नियोजनास मदत ; दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारीपासून, तर बारावीच्या १० फेब्रुवारीपासून सुरू
13 October, 2025
पुणे |दि.१३(जरंडेश्वर समाचार):-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) आणि बारावी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षांचे प्राथमिक वेळापत्रक जाहीर केले आहे.
राज्यातील सर्व नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा एकाच कालावधीत पार पडणार असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नियोजनासाठी ही घोषणा महत्त्वाची ठरणार आहे.
बारावी (HSC) परीक्षांचे वेळापत्रक
बारावीच्या लेखी परीक्षा मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होणार असून, त्या बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी संपणार आहेत.
माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षाही या कालावधीतच होतील.
प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ ते सोमवार, २९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात येतील.
दहावी (SSC) परीक्षांचे वेळापत्रक
दहावीच्या लेखी परीक्षा शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होऊन बुधवार, १८ मार्च २०२६ पर्यंत चालतील.
तर प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा सोमवार, २ फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान घेतल्या जाणार आहेत.
या कालावधीत शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षाही होतील.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आगाऊ नियोजन
मंडळाने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन करता यावे आणि त्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी व्हावा या हेतूने या परीक्षा तारखा आगाऊ जाहीर करण्यात आल्या आहेत.
तसेच, या प्राथमिक वेळापत्रकाच्या आधारे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या अध्यापन व पुनरावलोकन सत्रांचे नियोजन करावे, असे आवाहनही मंडळाकडून करण्यात आले आहे.
अंतिम वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर होणार
या परीक्षांचे अंतिम व विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक यथावकाश राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
जाहिरातीची तारीख: १३ ऑक्टोबर २०२५
✍️ प्रमोद गोफणे, सहसचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय