साताऱ्यात ‘संविधान संघर्ष मोर्चा’; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर !
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध; आंबेडकरवादी एकजुटीचे दर्शन
13 October, 2025
सातारा, दि. १३ ऑक्टोबर (अजित जगताप)—भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील आंबेडकरवादी व संविधाननिष्ठ संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘संविधान संघर्ष मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाला जिल्ह्यातील हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना मागणीचे निवेदन सादर!
मोर्चाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून करण्यात आली. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी घोषणांनी दुमदुमलेल्या या महामोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर लाक्षणिक मोर्चा आणला.
मोर्चाचे प्रतिनिधीमंडळ जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांना सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेच्या रक्षणाची मागणी करणारे लेखी निवेदन सादर केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांशी मनमोकळापणाने संवाद साधत सर्वांची मने जिंकली. या वेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
न्यायालयात बूटफेक – भारतीय न्यायव्यवस्थेवर आघात
दि. ६ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या दालनात झेड सुरक्षेच्या कक्षेत असतानाही एका जातीयवादी विचारसरणीच्या वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून मारण्याचा धाडसपूर्ण व निंदनीय प्रयत्न केला.
ही घटना वैयक्तिक हल्ला नसून भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर गंभीर आघात करणारी असल्याचे मोर्चातील नेत्यांनी स्पष्ट केले.
या प्रकारामुळे जगभरात भारतीय न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन झाल्याचे ते म्हणाले.
आंबेडकरवादी नेत्यांची ज्वलंत भूमिका
या मोर्चात सातारा जिल्ह्यातील प्रख्यात आंबेडकरवादी नेते नगरसेवक अमर गायकवाड,गणेश भिसे, अशोक गायकवाड, अजित जगताप, सुरेश बोतालजी,उमेश चव्हाण, सत्यवान कमाने,अमोल आवळे, प्रा. अरुण गाडे, दादासाहेब ओव्हळ, नितिन वायदंडे, एडवोकेट राजेंद्र गलांडे, आयुष्यमान राजेंद्र कांबळे, किशोर गालफाडे, सतीश गाडे, भरत लोकरे, रामदास भाई कांबळे, जगदीश कांबळे बावधन, संजय गाडे, रमेश उबाळे, मधुकर आठवले, सादिकभाई शेख, उमेश खंडझोडे, प्रदीप बोतालजी, विजय गायकवाड, के. एस. कांबळे, विशाल कांबळे, सुधाकर काकडे, अरुण पोळ, वैभव गायकवाड, योगेश धोत्रे, जीवन लिंबारे, किरण बगाडे, सिद्धार्थ कांबळे, अमोल गंगावणे, अरुण पवार, ओबीसी नेते भरत लोकरे, प्रकाश फरांदे, अझर मणेर, भाऊसाहेब वाघ, किशोर धुमाळ, अरुण जावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिलांमध्ये पायल गाडे, रेखा सकट,पूजा बनसोडे, वंदना गायकवाड, संघमित्रा ओव्हळ यांच्यासह अनेक माता–भगिनींनी उन्हाची पर्वा न करता मोर्चात उत्साहाने सहभाग नोंदवला.
प्रतापसिंह नगर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पाणी व अल्पोहाराची व्यवस्था केली. तसेच विहे (ता. पाटण) व परिसरातील बौद्ध विकास मंडळांनीही बांधवांसाठी खाद्यपदार्थ व पिण्याच्या पाण्याची सोय केली.
'राजकीय पक्षांचे बेगडी संविधानप्रेम उघडे'
या महामोर्चाच्या वेळी सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीसाठी अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील बहुतेकांनी संविधान संघर्ष मोर्चाकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले.
हा छुपा मनुवादी आणि सनातनी विचार आंबेडकर अनुयायांनी झुगारून दिला पाहिजे, असे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब गायकवाड आणि आनंद साठे यांनी तीव्र शब्दांत सांगितले.
भविष्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम
या संविधान संघर्ष मोर्चामुळे सातारा जिल्ह्यातील आंबेडकरवादी एकजूट अधोरेखित झाली आहे.
भविष्यात या एकजुटीचे राजकीय रूपांतर झाल्यास, प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसू शकतो, अशी स्पष्ट जाणीव या आंदोलनाने दिली आहे. यावेळी समता सैनिक दलाने चोक बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे या सर्व समता सैनिक दलाचे संविधान संघर्ष मोर्चाच्या वतीने यावेळी अभिनंदन करण्यात आले त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय