सासपडेतील शाळकरी मुलीचा संशयास्पद मृत्यू : गावात तणावाचे वातावरण
१३ वर्षीय आर्या चव्हाण घरीच आढळली निपचित अवस्थेत ;. संशयिताने अत्याचार करून खून केल्याची गावात चर्चा
11 October, 2025
सातारा, दि. ११(वृत्तसेवा) :सातारा तालुक्यातील सासपडे गावात एका १३ वर्षीय शाळकरी मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत मुलीचे नाव आर्या सागर चव्हाण (वय १३) असे असून, हा धक्कादायक प्रकार १० ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्या आपल्या भावासह गावातील शाळेत शिक्षण घेत होती. शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यावर ती घरी परतली. वडिलांकडून चावी घेऊन तिने घर उघडले. काही वेळानंतर तिचा लहान भाऊ सार्थक घरी परतला असता त्याला आर्या घरात निपचित अवस्थेत आढळली. त्याने तत्काळ वडिलांना याची माहिती दिली.
कुटुंबीयांनी तातडीने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले आणि तेथून पुढील उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती आर्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने रुग्णालयात जमा झाले. त्यामुळे रुग्णालय परिसरात आणि गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
आर्या चव्हाण हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी, गावात संशयिताने तिच्यावर अत्याचार करून खून केल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी बोरगाव पोलीस ठाण्याचे पथक करत असून, घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.
गावात या घटनेमुळे शोककळा पसरली असून नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. पोलिसांकडून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय