single-post

शांतीदूत जनकल्याण पक्ष’ची स्थापना – जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची घोषणा

कबुतर चिन्हावर मुंबई महापालिका निवडणुकीत उतरतील उमेदवार

11 October, 2025

मुंबई :दि.११(वृत्तसेवा):-मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबुतरखाने बंद केल्याने मृत झालेल्या कबुतरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी दादरच्या योगी सभागृहात आयोजित प्रार्थना सभेत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. या पक्षाचे नाव ‘शांतीदूत जनकल्याण पक्ष’ असे असून कबुतर हे पक्षाचे निवडणूक चिन्ह असणार आहे.

प्राण्यांच्या संरक्षणासाठी राजकारणात प्रवेश

मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले, “कबुतरखाने बंद केल्याने हजारो कबुतरांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी ही सभा घेतली असली, तरी आता आम्ही प्राण्यांच्या हक्कांसाठी राजकीय पातळीवर लढणार आहोत.”

मुंबईतील जैन समाज समाजसेवेसाठी नेहमी पुढे असतो. “पूरग्रस्तांसाठी आम्ही दोन कोटी रुपये दिले, पण आमच्या प्रश्नांकडे कोणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे स्वतःचा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी स्पष्ट केले.

 कबुतर चिन्हावर निवडणुकीचा निर्धार

मुनी म्हणाले, “शिवसेनेच्या स्थापनेवेळी बाळासाहेब ठाकरेंनी वाघाचे चिन्ह घेतले. वाघ हे जगदंबेचे वाहन आहे. तसेच आमचे चिन्ह ‘कबुतर’ — शांतीचे प्रतीक आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत प्रत्येक वॉर्डात आमचे उमेदवार उभे राहतील.”

 गोमाता व इतर प्राण्यांसाठी पुढाकार

“आज कुत्रा, गाय सुरक्षित नाही. उद्या उंदरावर याल — तो तर गणपतीचे वाहन आहे. झाडे तोडून माणसाने विकासाच्या नावाखाली प्राण्यांना बेघर केले. आम्ही पुढे गोमाता आणि इतर प्राण्यांसाठीही काम करणार,” असेही त्यांनी नमूद केले.

⚖️ “आम्ही फक्त बाळासाहेब, दिघे आणि फडणवीस यांनाच मानतो”

राजकीय भूमिकेबाबत विचारले असता मुनी म्हणाले, “आम्ही बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मानतो. इतर कोणत्याही नेत्यांवर आमचा विश्वास नाही.”

मंगलप्रभात लोढा गैरहजर राहिल्याबाबत त्यांनी म्हटले, “लोढा हे एका समाजाचे नव्हे, तर राज्याचे मंत्री आहेत. ते आमच्यासोबत का नाहीत, हे त्यांनाच विचारावे.”

 ‘शांतीदूत’ पक्षाचा नवा राजकीय प्रवास सुरू

मुंबईच्या धर्मसभेत झालेल्या या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पक्षाच्या रूपाने ‘शांतीदूत जनकल्याण पक्ष’ाचा प्रवेश झाला आहे. कबुतराच्या प्रतीकातून शांती आणि प्राणीसंवर्धनाचा संदेश देत हा पक्ष पुढे किती प्रभाव निर्माण करतो, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.