single-post

साताऱ्यात बिबट्याची दहशत; नागरिकांत भीतीचे वातावरण, वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह?

गोळीबार मैदान आणि शाहूनगर परिसरात बिबट्याच्या डरकाळ्यांनी नागरिक भयभीत ; .शहरालगत नागरी वस्तीत बिबट्याचा शिरकाव — सीसीटीव्हीत कैद झालेला प्रकार ;. वनविभागावर निष्क्रियतेचे आरोप; नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त ; . पिंजरे लावून बंदोबस्त करा,

11 October, 2025

सातारा, दि. ११ ऑक्टोबर | सातारा शहराला लागून असलेल्या गोळीबार मैदान, शाहूनगर आणि आजूबाजूच्या भागात बिबट्याचा वाढता वावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. दररोज सायंकाळनंतर या परिसरात बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत असून, शाळा–कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वचजण आता घराबाहेर पडताना धास्तावले आहेत.

किल्ले अजिंक्यताऱ्यावर गेल्या काही वर्षांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. अलीकडेच या बिबट्याचा वावर शाहूनगर, गोळीबार मैदान आणि शिवप्रेमी कॉलनीपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. याच परिसरातील एका बंगल्यात बिबट्याने थेट शिरकाव केल्याची घटना नुकतीच सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामुळे वन्यप्राणी आता नागरी वस्तीत शिरत असल्याचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, वनविभागाच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, “बिबट्याचे हल्ले वाढत असतानाही विभाग झोपा काढतोय. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत, अन्यथा नागरिकांचा संयम सुटेल.” जिल्ह्यातील शेतकरी वर्ग आणि ग्रामस्थांनीही भीती व्यक्त केली असून, शेळ्या–मेंढ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे.

नागरिकांनी वनविभागाला स्पष्ट मागणी केली आहे की, “ज्या भागात बिबट्याचा वावर आहे, त्या-त्या ठिकाणी तातडीने पिंजरे लावावेत व बंदोबस्त करावा. अन्यथा नागरिकांचा जीव धोक्यात येईल.”

स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनीही मुख्यमंत्री, वनमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. “सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा जीवितसंरक्षण हे सरकारचे कर्तव्य आहे. दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,” अशी त्यांची मागणी आहे.

सध्या नागरिक रात्रीच्या वेळी बाहेर पडणे टाळत असून, परिसरातील वातावरण भीतीग्रस्त बनले आहे. वनविभागाने यावर तात्काळ पावले उचलून जनतेचा विश्वास परत मिळवावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.