single-post

कास पुष्प पठारावर ई-व्हेहिकल सफारीची प्रारंभ

जागतिक पर्यटन दिनानिमित्त शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते उद्घाटन; प्रदूषणमुक्त कास पठारासाठी प्रशासनाचा उपक्रम

29 September, 2025

मेढा दि.२८(जरंडेश्वर समाचार):-जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या कास पुष्प पठारावर आजपासून ‘ई-व्हेहिकल सफारी’ सुरू झाली असून, राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून झालेल्या या सोहळ्यात सिंह यांच्यासोबत त्यांची पत्नी अर्चना प्रताप सिंह तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेले आणि ‘महाराष्ट्राचे चेरापुंजी’ म्हणून ओळखले जाणारे कास पठार पावसाळ्यात रंगीबेरंगी फुलांनी बहरते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या या पठारावर दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक फुलांचा बहर पाहण्यासाठी येतात. वाढत्या पर्यटकांमुळे प्रदूषणाचा धोका वाढू नये, यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील व उपवनसंरक्षक यांच्या संकल्पनेतून ही ई-व्हेहिकल सफारी प्रारंभ करण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांना सोयीस्कर प्रवासासोबतच पर्यावरणावर होणारा भार कमी होईल.

“कास पठाराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून येथील पर्यावरणीय समतोल राखणे अत्यावश्यक आहे. वनविभाग, प्रशासन आणि कास कार्यकारी समितीने एकत्र येऊन हे पठार प्रदूषणमुक्त ठेवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. तसेच नवनवीन फुलांच्या प्रजाती विकसित करण्यासाठी अधिक भर द्यावा,” असे प्रतिपादन सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.

या प्रसंगी अधिकाऱ्यांनीही पर्यटकांना स्वच्छतेबाबत आवाहन केले. कास पठारावर भेट देताना प्लास्टिक वा इतर कचरा न टाकता हा अमूल्य नैसर्गिक वारसा प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले

या सोहळ्याला सातारा व मेढा वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच वनपाल, वनरक्षक अमोल सातपुते, संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कास पठारासह सातारा जिल्हा आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशामुळे पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरला आहे. अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला असून, त्यात प्रतापगड किल्ल्याचाही समावेश आहे. त्यामुळे सातारा जिल्हा आता आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहे.

 कास पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांनी ई-व्हेहिकल सफारीचा लाभ घेत, स्वच्छता व प्रदूषणमुक्ततेसाठी स्वतःची जबाबदारी पार पाडावी,  असे आव्हान उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले आहे.