महाबळेश्वर रस्त्यावर बिबट्याचा वावर
पांगारी गावात भीतीचे वातावरण; वन विभागाकडे बंदोबस्ताची मागणी
29 September, 2025
पाचगणी दि.२३ (जरंडेश्वर समाचार):-महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी गावच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर थेट वाहनांसमोर बिबटा दिसल्याने ग्रामस्थ आणि प्रवासी भयभीत झाले आहेत.
पांगारी फाट्याजवळ महेंद्र पांगारे हे कुटुंबासह चारचाकी वाहनातून जात असताना झुडपातून अचानक बिबट्या बाहेर आला. हा थरारक प्रसंग काही क्षणच घडला असला तरी वाहनातील सर्वांचीच धडधड वाढली. गाड्यांचा आवाज होताच बिबट्या पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेला. याचा व्हिडिओ स्थानिकांनी टिपला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गावकऱ्यांच्या मते, डोंगराळ भाग आणि झुडपी जंगल परिसरात बिबट्याची हालचाल सुरू आहे. यामुळे वाहनचालक आणि पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, पांगारी गावातील जननी माता मंदिर परिसरात रोज सायंकाळी महिलांसह नागरिक दर्शनासाठी जातात. सध्या नवरात्र उत्सव सुरू असल्याने मंदिराकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. अशा परिस्थितीत वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याला पकडावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
वन अधिकाऱ्यांनी मात्र ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय