single-post

सत्कारानंतरच्या दुसऱ्याच दिवशी भावाने उघडले आरोपांचे दार

सत्कार सोहळ्यानंतर पत्रकार परिषदेत रमेश पाटील यांचा सनसनाटी आरोपांचा वर्षाव

24 September, 2025

सातारा दि. २४(अजित जगताप) :अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांचा साताऱ्यात भव्य सत्कार संपन्न झाला. या सत्काराचा उत्साह ओसरत नाही तोच दुसऱ्याच दिवशी त्यांच्या धाकट्या भावाने व साहित्यिक रमेश पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोपांची मालिका करत खळबळ उडवली आहे.

शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ पत्रकार शिवाजी राऊत, चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, वामन गंगावणे, मानसिंग यादव आदी उपस्थित होते."विश्वास पाटील साहित्यिक नव्हे, थापाडे!"पत्रकार परिषदेत बोलताना रमेश पाटील म्हणाले, "विश्वास पाटील साहित्यिक नाहीत, ते थापाडे आहेत. त्यांच्या कादंबऱ्या बोगस आहेत. ते माझे बंधू असले तरी माणसं मारण्याचीच त्यांची स्टाईल आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, मराठा आरक्षणासाठी ५९ मोर्चे निघाले तेव्हा विश्वास पाटील सहभागी झाले नाहीत. मात्र हैदराबाद गॅझेटवर जरांगे पाटील यांनी जमीन मऊ केल्यानंतर ते स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी पुढे सरसावले,रमेश पाटील यांनी स्पष्ट केले की, घर व जमीन आजही एकच आहे. ते दोघे फक्त मुंबई-पुण्यात स्वतंत्र राहत असले तरी कुटुंबीय भांडण काही नाही. मात्र,

 "साहित्यिक म्हणून त्यांची भूमिका नेहमीच संधीसाधूपणाची राहिली आहे. पुरंदरे प्रकरण गाजले, राजमाता चारित्र्यप्रकरण पेटले, तरी त्यांनी गप्प राहून ‘क्रीम पोस्टिंग’ मिळवण्याचा मार्ग निवडला."

पत्रकार परिषदेत रमेश पाटील यांनी आणखी काही राजकीय संदर्भ दिले."विश्वास पाटील यांनी काँग्रेसची नाळ घोटून झाल्यानंतर २०१५ मध्ये भाजप नेत्यामार्फत आर.एस.एस. प्रमुखांना ‘पानिपत’ पुस्तक भेट देण्याचा प्रयत्न केला होता."

"लोकसत्ता वृत्तपत्राने टीका केल्यावर त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. मात्र, कधीही तारखेला हजर झाले नाहीत."भावाची टीका करताना रमेश पाटील यांनी मराठीतल्या लोकोक्तींच्या धाटणीचे शब्दप्रयोग वापरले—“पडवळचे फुल दोडक्याला... काजळ कुंकू बोडकिला...”या उपमांमधून त्यांनी विश्वास पाटील यांच्या साहित्य व भूमिकांवर थेट प्रहार केला,विश्वास पाटील यांच्यावरील या आरोपांनी साताऱ्यातीलच नव्हे तर संपूर्ण साहित्य विश्वात खळबळ माजली आहे. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सत्काराच्या निमित्ताने निर्माण झालेला उत्साह काही तासांतच आरोप-प्रत्यारोपांच्या भोवऱ्यात अडकला आहे.

तरुण साहित्यिक व अभ्यासकांकडून आता प्रश्न विचारले जात आहेत की—

"या वादाच्या पार्श्वभूमीवर खरी बाजू नेमकी कुणी धाडसाने मांडणार?"