single-post

छत्रपतींच्या राजधानीतून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मुस्लिम संघटनांची स्नेह भेट

साताऱ्यातून जीवनावश्यक साहित्य व शैक्षणिक किट्स रवाना – मानवतेचा संदेश अधोरेखित

30 September, 2025

सातारा, दि.३० (जरंडेश्वर समाचार) मराठवाड्यातील महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या हजारो कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी साताऱ्यातील जमियत उलेमा-ए-हिंद व खिदमत-ए-खलक या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते अझर मणेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातून भूम-परांडा परिसरातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक साहित्याने भरलेली गाडी रवाना करण्यात आली.

पूरग्रस्तांना स्नेहभेट म्हणून अन्नधान्य (तांदूळ, गहू, डाळी, पीठ, तेल, साखर), भाजीपाला (कांदा, बटाटा, कोबी, कारले, टोमॅटो), तयार खाद्यपदार्थ (बिस्कीट, फरसाण, बटर, टोस्ट, फूड पॅकेट्स) यांचा समावेश करण्यात आला. तसेच कपडे, ब्लँकेट्स, चादरी, टॉवेल, औषधे, सॅनेटरी पॅड्स, ड्रायपर्स, पिण्याचे पाणी आदी वस्तू देखील पाठविण्यात आल्या.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांसाठी पेन, वही, पुस्तकांचे संच तयार करून शिक्षणाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. शैक्षणिक किट्स उपलब्ध करून देत पूरग्रस्तांच्या मुलांच्या भविष्यासाठी या संघटनांनी आदर्श ठेवला आहे.

“माणुसकी हाच खरा धर्म” — सादिकभाई शेख,कार्यक्रमात बोलताना खिदमत-ए-खलक चे सादिकभाई शेख म्हणाले, “सर्वांचे पैगंबर यांनी माणुसकीचा संदेश दिला आहे. धर्म-जात न पाहता संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणे हेच इस्लामचे तत्त्व आहे. आज मराठवाड्यातील देशबांधव संकटात आहेत, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे, त्यांना आधार देणे हीच खरी पैगंबरांची शिकवण आहे. ती आपण कृतीतून दाखवली नाही तर ‘आय लव्ह मुहम्मद’ म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही.”

सातारकरांचा उत्स्फूर्त सहभाग,या मदत उपक्रमात सर्वधर्मीय बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. व्यापारी, अधिकारी, महिला, तरुण तसेच लहान मुलांनी देखील स्वतःच्या बचतीतून मदत केली. महिलांनी नवीन पोशाख तर बाळांनी स्वतःच्या गुलकंदातील पैसे पूरग्रस्तांसाठी दिले. स्त्रियांचा सहभाग विशेष वाखाणण्याजोगा ठरला.

संघटनांचा पुढाकार व नेतृत्व,मदत साहित्य पाठविण्याचे मार्गदर्शन जमियत उलेमा चे अध्यक्ष मौलाना रियाज, खिदमत-ए-खलक चे सादिकभाई शेख व हाजी मोहसीन बागवान यांनी केले.

या उपक्रमात मुफ्ती उबेदुल्लाह आत्तार, मुफ्ती मोहसीन बागवान, अझहर मणेर, हाजी शाकीर बागवान, रझिया अप्पा शेख, जबीन अप्पा मुलाणी, असिफ खान, शाहरुख शेख, सिद्दीक खान, मौलाना अलीम सय्यद, एजाज काझी, हाफिज मुराद, पिंटूशेठ सुतार, साजिद शेख, इस्माईल पठाण आदींसह शेकडो स्वयंसेवक सहभागी झाले.

विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती,पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी जमियत उलेमा-ए-हिंद सातारा यांच्या वतीने विशेष शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा सचिव मुफ्ती मोहसीन बागवान यांनी दिली.