single-post

नाशिक जिल्हा सकल मातंग समाज चिंतन बैठक उत्साहात संपन्न

अण्णाभाऊ साठे स्मारक, आरक्षण वर्गीकरण व निवडणूक प्रतिनिधित्वावर सखोल चर्चा ; नाशिक महानगरपालिकेत किमान ४ उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य ;.अमोल भाऊ आल्हाट, बालू भाऊ आठवले, राजाभाऊ थोरात यांना समाजाचा पाठिंबा

20 September, 2025

नाशिक, दि. 20 (जरंडेश्वर समाचार): नाशिक जिल्हा सकल मातंग समाजाची चिंतन बैठक काल (दि. 19, शुक्रवार) मोठ्या उत्साहात संपन्न झाली. निलगिरी बाग येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे ही बैठक पार पडली. समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तसेच आगामी सार्वत्रिक निवडणुकांतील रणनीतीबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीचे अध्यक्षस्थान मा. सुभाष अण्णा शेजवळ यांनी भूषविले. बैठकीच्या प्रारंभी समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा आढावा घेण्यात आला. त्यात नाशिक शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारणीचा मुद्दा, मातंग समाजाला आगामी सार्वत्रिक निवडणुकांत योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठीचे प्रयत्न, तसेच आरक्षण वर्गीकरण या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता.

बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून मा. विश्वासरावजी कांबळे, गोपाळजी बस्ते, दिनकररावजी लांडगे, अशोकजी साठे, धनंजय जाधव, सूर्यकांतजी भालेराव, सुधाकर इस्ते, कांबळे बाबा, नंदाताई कांबळे, आसारामजी घाटूळ, नारायणजी वैराळ, पोपटजी वाघ, अंकुश भाऊ सोळसे, नानाभाऊ जाधव, साहेबराव शृंगार, नानाजी खंडाळे, सुरेशजी साबळे, दिलीपजी बेंद्रे, पुंडलीक कांबळे, सदाभाऊ कांबळे, जितेंद्र गायकवाड, विलासजी खैरनार, रमेश नेटारे, किशोरजी शिरसाट, गजानन रनबावळे, बापू सपकाळे, भारत वाघमारे, दिलीपजी खरात, शांताराम आहिरे, गोरख साबळे, नाना भोंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजाच्या एकीवर भर देत आगामी निवडणुकांत मातंग समाजाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. विशेषत: नाशिक महानगरपालिका निवडणुकीत किमान ४ उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्यासाठी समाजाने संघटीतपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन बैठकीचे अध्यक्ष सुभाष अण्णा शेजवळ यांनी केले.

तसेच नाशिक शहरातील सक्षम उमेदवार म्हणून मा. अमोल भाऊ आल्हाट, बालू भाऊ आठवले, राजाभाऊ थोरात या नावांवर समाजाने एकमुखाने पाठिंबा द्यावा, असे आवाहन बैठकीतून करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिनजी नेटारे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार गोपाळजी रनशिंगे यांनी मानले.

या बैठकीमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाच्या रणनीतीला नवे वळण मिळणार असून, समाजातील सक्रीय कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.