single-post

साताऱ्यात दि.२४ला, शिवछत्रपतींचा दुसरा राज्याभिषेक आणि सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त भव्य मिरवणूक

छ. प्रतापसिंह हायस्कूलपासून मिरवणुकीस सुरुवात; जिजाऊ वंदनेने होईल उद्घाटन ;शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात सातारा दुमदुमणार ; सत्यशोधक समाजाच्या विचारांचा गौरव—स्त्रीमुक्ती, शिक्षण व सामाजिक समतेचा संदेश

23 September, 2025

सातारा | दि.२३ ,(जरंडेश्वर समाचार) :-बुधवार दि. २४ ला  सायंकाळी ४ वाजता साताऱ्यात छत्रपती शिवछत्रपतींच्या दुसऱ्या शाक्त राज्याभिषेक दिन आणि सत्यशोधक समाजाच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही मिरवणूक ऐतिहासिक राजवाड्यावरील छ. प्रतापसिंह हायस्कूल—जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत होते—या शाळेच्या प्रवेशद्वारातून सुरू होणार आहे. जिजाऊ वंदना करून मिरवणुकीस प्रारंभ होईल. कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवराय, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदी महामानवांच्या जयघोषात मिरवणूक पुढे सरकणार आहे.

 विशेष कार्यक्रम आणि निवेदन,मिरवणुकीत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेले आणि आचार्य अत्रे यांनी निर्मित "महात्मा फुले" चित्रपटातील गाणे सादर होणार असून त्याचे निवेदन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आवाजात होणार आहे. या गाण्यात महात्मा फुलेंच्या सत्यधर्म स्थापनेचे आणि समाजजागृतीचे दर्शन घडणार आहे.

मिरवणुकीदरम्यान सहभागी नागरिकांना निवेदनाद्वारे इतिहासातील महत्वाच्या घटना आठवण करून दिली जाणार आहे –

इ.स. १६७४ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या आग्रहास्तव छत्रपती शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक,

१८७३ साली महात्मा फुलेंकडून सत्यशोधक समाजाची स्थापना,१९३२ मधील पुणे करार,तसेच १९६९ मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात.

 सत्यशोधक परंपरेचा गौरव,मिरवणुकीतून महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारलेल्या समाजसुधारणांचा गौरव होणार आहे. सार्वत्रिक शिक्षण, स्त्रीमुक्ती, अस्पृश्यता निवारण, जाती निर्मूलन, शेती सुधारणा, सहकार, आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन आदी चळवळींनी समाजाला दिलेल्या दिशा लोकांसमोर मांडल्या जाणार आहेत.

कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, सयाजीराव गायकवाड, डॉ. आंबेडकर, वीर लहुजी वस्ताद, फातिमा शेख, ताराबाई शिंदे, तानुबाई बिरजे, सावित्रीबाई रोडे, पंडित धोंडीराम कुंभार यांच्यासह अनेक सत्यशोधकांचे योगदान विशेष घोषणांमधून अधोरेखित होणार आहे.

 लोकजागृतीचे माध्यम,कार्यक्रमात महात्मा फुले यांनी लिहिलेल्या अखंडांचे सामूहिक गायन, शाहीर अमर शेख यांचे समाजजागृती करणारे गीत, तसेच वामनदादा कर्डक यांच्या ओव्या सादर करून शिवरायांच्या लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचे वर्णन करण्यात येणार आहे.

याशिवाय मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, फातिमा शेख यांसारख्या सत्यशोधक महिलांच्या अग्रणी कार्याची आठवण करून दिली जाणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी, जी.डी. बापू लाड, प्रबोधनकार ठाकरे यांसह असंख्य सत्यशोधक क्रांतिकारकांचाही जयजयकार केला जाणार आहे.

समारोप,मिरवणुकीचा समारोप शिवतीर्थावर शिवरायांना अभिवादन करून तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला अभिवादन करून होणार आहे. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी शक्य ते सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, आपल्या कुटुंबीय-नातेवाईक व मित्रमंडळींना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.साताऱ्याच्या ऐतिहासिक राजधानीत हा लोकजागृतीचा आणि संस्कृतीचा मेळा ठरणार आहे.