वाई खटल्याला नवे वळण : आरोपी डॉ. संतोष पोळ यांचा तपास अधिकाऱ्यांविरोधात अर्ज
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३१९ अन्वये तपास अधिकाऱ्यांना सह-आरोपी करण्याची मागणी
23 September, 2025
वाई, | दि.२३(जरंडेश्वर समाचार) – नऊ वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वाईतील तिहेरी हत्याकांड प्रकरणात आज नवे वळण आले आहे. या खटल्यातील प्रमुख आरोपी डॉ. संतोष पोळ यांनी तपास अधिकाऱ्यांविरोधातच न्यायालयात लेखी अर्ज दाखल करून गंभीर आरोप लावले आहेत. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अर्जातील मुख्य आरोप,डॉ. पोळ यांच्या वतीने वकील अॅड. दिनेश धुमाळ यांनी दाखल केलेल्या अर्जात तपास अधिकाऱ्यांनी पुराव्यात जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३१९ अंतर्गत या अधिकाऱ्यांसह काही इतर व्यक्तींना खटल्यात सह-आरोपी म्हणून सामील करण्याची मागणी अर्जात करण्यात आली आहे. हा अर्ज मा. न्यायमूर्ती आर.एन. मेहरे यांच्याकडे सादर करण्यात आला असून, यावर पुढील सुनावणी होणार आहे.
पार्श्वभूमी : तिहेरी खून प्रकरण,२०१६ मध्ये घडलेल्या या गुन्ह्यात सौ. मंगला जेधे, नथमल भंडारी आणि सलमा शेख यांची निर्दय हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. आरोपी डॉ. पोळ यांच्याविरोधातील खटला गेल्या काही वर्षांपासून वाई जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे.
‘माफीच्या साक्षीदार’च्या जबाबातील मुद्दे,डॉ. पोळ यांच्या बचाव पक्षाने दाखल केलेल्या अर्जात ‘माफीच्या साक्षीदार’ ज्योती पांडुरंग मांढरे हिच्या ७ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या कबुलीजबाबावर विशेष भर देण्यात आला आहे. तिच्या जबाबानुसार –
गुन्ह्यासाठी वापरलेले ‘स्कोलिन’ इंजेक्शन घोटावडेकर हॉस्पिटलमधून अजीम मुजावर या व्यक्तीने आणले होते.
खूनासाठी वापरलेले ई.सी.जी. मशीन देखील त्याच हॉस्पिटलमधून आणले गेले होते.
मृत नथमल भंडारी यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आरोपी विकास मांढरे यांनी गहाण ठेवली होती.
या जबाबावरून बचाव पक्षाचा दावा आहे की तपास अधिकाऱ्यांनी मुद्दामहून काही धागेदोरे दडपले आणि काही बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. याच कारणास्तव त्यांना खटल्यात सह-आरोपी करणे आवश्यक असल्याचे अर्जात नमूद केले आहे.
संशयाचे धागे,बचाव पक्षाने यावरही लक्ष वेधले आहे की ज्योती मांढरे हिला न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान गर्भवती असतानाही सतत जामीन मिळत राहिला. या घटनेतून तपास अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते, असे बचाव पक्षाचे मत आहे.
पुढील दिशा,आरोपीकडून आलेल्या या नव्या अर्जामुळे खटल्याची दिशा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांविरोधात पुढील कारवाई करण्याचा निर्णय घेतला, तर या प्रकरणाला मोठे नवे वळण मिळेल. सध्या वाई जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असून, यावर होणारा निर्णय हा खटल्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकते.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय