single-post

कोरेगावात मुसळधार पावसाने हाहाकार – लोडरीला पूर, ग्रामीण रुग्णालय परिसरात भागांत पाणी शिरले

मॉडर्न शाळा–बाजारपेठ मार्ग वाहतुकीसाठी बंद ; ५० वर्षांतील सर्वात मोठा पाऊस, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

18 September, 2025

कोरेगाव, ता. १८ (जरंडेश्वर समाचार):-मंगळवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे कोरेगाव शहर जलमय झाले आहे. तिलागंगा व वसना नद्या उफाळून आल्याने खालच्या भागांत पाणी शिरले आहे. गोसावी वस्ती मध्ये पाणी शिरले त्यामुळे मोठे नुकसान झाले असावे असा अंदाज आहे. अण्णाभाऊ साठे नगर येथील लॉटरीला पूर आल्यामुळे पाणी लॉटरीच्या पात्रा बाहेर आले आहे. द मॉडर्न इंग्लिश स्कूल, मॉडल हायस्कूल व ग्रामीण रुग्णालय परिसर पाण्याखाली गेला असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

प्रशासनाकडून तातडीची सूचना,कोरेगाव नगरपंचायतीकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. मॉडर्न शाळेपाठीमागील रस्त्यावरून प्रचंड पाणी वाहत असल्याने मॉडर्न शाळा–बाजारपेठ मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी या मार्गाने पायी किंवा वाहनाने जाण्याचा प्रयत्न करू नये. तसेच शहरात पाऊस सुरूच असल्याने अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आणीबाणी सेवांसाठी संपर्क,आणीबाणी परिस्थितीत मदतीसाठी कोरेगाव म्युनिसिपल कौन्सिलचा दूरध्वनी क्रमांक ०२१६३-२२०५६० उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन,अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित ठिकाणी राहावे, सोशल मीडियावरील अफवांकडे दुर्लक्ष करून केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.