single-post

पंढरीत बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांचा लहुजी शक्ती सेनेतर्फे सन्मान

. बार्टी व आर्टी संस्थेच्या सुधारकामागे सुनील वारे यांचे नेतृत्व ठळक ;पंढरपूरात मान्यवर व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला सन्मान सोहळा

18 September, 2025

पंढरपूर दि.१८(जरंडेश्वर समाचार) : पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमात बार्टी (महाराष्ट्र शासनाची बळिराजा अनुसूचित जाती संस्था) चे महासंचालक सुनील वारे यांचा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र सचिव व जनसेवक देविदास कसबे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी संघटनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महासंचालक सुनील वारे यांचे वडील, स्वर्गीय ह.भ.प. बाबुराव वारे महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बाबुराव महाराज हे मूळचे सांगली जिल्ह्यातील बीळाशी गावचे असून ते संत शिवलिंग महाराजांचे शिष्य होते. त्यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याचा वारसा पुढे नेत महाराष्ट्रभर भजन-कीर्तनाचा प्रसार केला होता. त्यांनी तब्बल 70 वर्षे अखंड पंढरपूरची वारी केली होती. त्यांच्या अध्यात्मिक कार्याबरोबरच त्यांनी कुटुंबातील मुलाबाळांना उच्चशिक्षण दिले. आज त्यांच्या तिसऱ्या पिढीतील मुले-नातवंडे शिक्षणासोबतच अध्यात्म, गायन व वादन यातही पारंगत झाली आहेत.

या पार्श्वभूमीवर सुनील वारे यांनी वडिलांचा वारसा जपत समाजकारण, शिक्षण व प्रशासन या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी बार्टी संस्थेमध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. विद्यार्थी हितासाठी घेतलेले निर्णय, आधुनिक सुविधा व विविध प्रशिक्षण उपक्रमांमुळे बार्टीची ओळख राष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली आहे. विशेषतः मातंग समाजासह तत्सम जातीतील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षा यांसाठी प्रशिक्षण केंद्रे प्रभावीपणे कार्यरत केली आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या कार्याचे अनेकदा कौतुक केले आहे. सध्या ते आर्टी संस्थेचाही अतिरिक्त पदभार सांभाळत असून त्या संस्थेची परिस्थितीही त्यांनी बदलून दाखवली आहे. त्यांच्या विद्वत्तेचा व कार्यकौशल्याचा फायदा दोन्ही संस्थांना होत असल्याचे या सन्मान कार्यक्रमातून अधोरेखित झाले.

या वेळी सुनील वारे यांचे मोठे बंधु सेवानिवृत्त अधिकारी अनिल वारे, लहान बंधु संजय वारे सर, संपूर्ण वारे कुटुंबीय, प्रा. गणवत साठे, विकास आयवळे, शरद अष्ट्रळ, तालुका प्रमुख समाधान वायदंडे यांच्यासह लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.