सातारा शाही दसरा आता 'राज्य महोत्सव': ऐतिहासिक परंपरेला मिळाली अधिकृत मान्यता
मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा; पर्यटन वाढीसह सांस्कृतिक परंपरेला मिळणार अधिकृत मान्यता सातारा जिल्ह्यातील आमदारांच्या मागणीला यश.
19 September, 2025
सातारा दि.१९(जरंडेश्वर समाचार):-सातारा जिल्ह्यातील भाजप नेते आणि आमदारांनी सातारा येथील ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ दर्जा देण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले आहे. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ग्वाही दिली आहे.
सातारकर मावळ्यांची मागणी आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया,भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे आणि आमदार महेश शिंदे यांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे सादर केली. महायुतीचे सातारा जिल्हा समन्वयक सुनील काटकर, काका धुमाळ आणि चिन्मय कुलकर्णी यांनी हे पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांना भेट दिली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सातारा शाही दसरा महोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ दर्जा देण्याची ग्वाही दिली.
याला राज्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा शाही दसरा महोत्सवासाठी पर्यटन आणि जिल्हा नियोजन मधून भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या मागणीला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
महोत्सवाचे ऐतिहासिक महत्त्व
सातारा शहराची ओळख ऐतिहासिक आणि वैभवशाली शाही दसरा महोत्सवाशी जोडली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हा महोत्सव साजरा होत आहे आणि त्याला राज्यस्तरावर अधिकृत स्थान मिळावे यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील होते. हा निर्णय झाल्यामुळे साताऱ्याच्या सांस्कृतिक परंपरेला अधिकृत मान्यता मिळेल आणि महोत्सवाचे महत्त्व अधिक वाढेल.
मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनुसार, आता सातारा शाही दसरा महोत्सवाला अधिकृतरीत्या ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले जाईल. यामुळे महोत्सवासाठी अधिक निधी उपलब्ध होईल आणि त्याचे प्रचार-प्रसार देखील वाढेल. सातारा जिल्ह्यातील लोक आणि स्थानिक नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या भेटीदरम्यान भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण जंगम, तेजस जगताप, प्रथमेश इनामदार, रवींद्र लाहोटी, प्रवीण कणसे या सर्वांनी उपस्थित राहून मागणीला पाठिंबा दर्शविला.
सातारा जिल्ह्यातील शाही दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा दर्जा उंचावण्यात मोलाची भर पडेल. सातारकरांच्या भावना आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्यांनी या मागणीला पाठिंबा दर्शविल्यामुळे महोत्सवाचे भवितव्य उज्ज्वल झाले आहे.