कानपूर प्रकरणावरून साताऱ्यात मुस्लिम समाज बांधवांकडून जाहीर निषेध
धार्मिक स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याचा आरोप ; शांततेत पण ठामपणे मुस्लिम समाजाची एकजूट दाखवली ; .निवेदन शासनापर्यंत पोचविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
19 September, 2025
सातारा |. दि. १५ (जरंडेश्वर समाचार)::-उत्तर प्रदेशातील कानपूर येथे पैगंबर मोहम्मद (स.) यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या शांततामय शोभायात्रेत "I LOVE MUHAMMAD" असा श्रद्धापूर्ण बॅनर झळकवल्याच्या प्रकरणी प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यांविरोधात सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निषेध नोंदविला.
जिल्हाधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन,दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात दाखल गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा निष्पक्ष तपास करावा, धार्मिक अभिव्यक्तीचे अधिकार सुरक्षित राहतील यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करावीत आणि देशात सलोखा टिकवण्यासाठी तटस्थ दृष्टीकोन ठेवावा, अशा ठाम मागण्या नोंदविण्यात आल्या.
संविधानिक अधिकारांवर गदा – निवेदन,निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, "पैगंबर मोहम्मद (स.) यांनी जगाला शांती, समानता व बंधुभावाचा संदेश दिला आहे. त्यांच्या नावावर प्रेम व्यक्त करणे हा कोणताही गुन्हा नसून, धार्मिक स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संविधानिक अधिकारांवर गदा आणणारी ही कारवाई आहे."
निषेधकांचे एकमुखी मत,आंदोलनात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी सांगितले की, अशा प्रकारच्या कारवाया केवळ मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या नाहीत तर लोकशाही मूल्यांनाही धक्का देणाऱ्या आहेत. "धार्मिक श्रद्धेच्या अभिव्यक्तीला गुन्हेगारी ठरविणे हे असहिष्णुतेचे द्योतक आहे," असे मत त्यांनी यावेळी नोंदवले.
समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती,या आंदोलनात राजू फिरोज जमादार, सलीम शल्की खान, लाविशक आबीद शेख, जुनेद सिराज काझी, अरवाजे फिरोज शेख, सादिक नजीर शेख, गुफरान स्माईल शेख यांच्यासह मुस्लिम समाजाचे अनेक बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांततेत पण ठामपणे आपली भूमिका मांडून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन,आंदोलनाचा वृत्तांत जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदवून घेतला असून निवेदन शासनापर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिले आहे.
साताऱ्यातील या आंदोलनातून मुस्लिम समाजाची एकजूट अधोरेखित झाली असून, न्याय व समानतेच्या तत्त्वांवर आधारित निर्णय घेण्याची जबाबदारी शासनावर आहे, असा ठाम संदेश या निषेधातून देण्यात आला.