single-post

विज्ञानाबरोबरच वैज्ञानिक दृष्टीची गरज-प्रशांत पोतदार

प्रात्यक्षिके, गाणी आणि संवादातून विज्ञानाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आदर्शवत

17 September, 2025

सातारा | दि.१७ (जरंडेश्वर समाचार):-“विज्ञानाच्या सृष्टी बरोबरच वैज्ञानिक दृष्टीची गरज आहे. केवळ तांत्रिक प्रगती पुरेशी नाही, तर निरीक्षण, तर्क, अनुमान आणि प्रचिती यावर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे हीच खरी प्रगती आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांनी केले.

सातारा जिल्हा व माळशिरस तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या तीन दिवसीय अनिष्ट अघोरी रूढी प्रथा निर्मूलन अभियानात विविध शाळांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विचारांचा थेट अनुभव देण्यात आला. या अभियानात प्रात्यक्षिके, संवाद व सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वैज्ञानिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अभियानाची सुरुवात सातारा जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील आश्रमशाळेत झाली. यावेळी श्री संत गाडगे महाराज मिशन, मुंबई चे चेअरमन मधुसूदन मोहिते पाटील, अजिंक्यतारा ऑटोमॅटिक चे विजय घाडगे, होमगार्ड तालुका समादेशक अधिकारी अमोल मोटे व निसर्गाची नाळ चे तुषार वरंडे उपस्थित होते.

माळशिरस तालुक्यातील सहभाग,यानंतर माळशिरस तालुक्यातील सदाशिवराव माने विद्यालयात मुख्याध्यापक अमोल फुले यांच्या नेतृत्वाखाली जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिक्षक महादेव पाटील, सुनील शिंदे, राजेश कांबळे व नंदकुमार पवार यांनी नियोजनात मोलाची भूमिका बजावली. त्याचप्रमाणे माळीनगर येथील मॉडेल हायस्कूल, गुलमोहर इंग्लिश स्कूल तसेच सवतगव्हाण येथील पारधी समाजातील विद्यार्थ्यांची आश्रमशाळा येथे हसत-खेळत गाणी व प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.

अभियानादरम्यान विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीचा अंगीकार करण्यासाठी पाच संकल्प घेण्यात आले : आयुष्यातील प्रश्न विवेकबुद्धी, आत्मविश्वास आणि तज्ज्ञांच्या सहाय्याने सोडवणे, गंडेदोरे, भोंदू बाबा, मांत्रिक यांच्या नादी न लागणे,संविधानात नमूद केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी आणि मानवतावाद या कर्तव्यांचे पालन करणे, कोणतेही वाईट व्यसन न करणे.समाजकार्यासाठी स्वतःचा वेळ आणि बुद्धी खर्च करणे.

सहकार्य व प्रतिसाद,या अभियानात आनंदी लायन्स क्लब, अकलूज च्या रश्मी ढोक, राजश्री जगताप, विद्या गिरमे, सुलभा ओव्हाळ, ज्योती लांडगे यांच्यासह मुख्याध्यापक बिराजदार सर, आंबेडकर सर, अनारसे सर, गिरीश ढोक, महादेव पाटील व राजेश पुराणिक यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा या अभियानाचा ठळक ठसा ठरला.

 या उपक्रमातून सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनाचे विचार पोहोचले असून, पुढील पिढीला विवेकनिष्ठ व तर्कशुद्ध समाजाच्या निर्मितीकडे प्रेरित करणारा हा उपक्रम ठरला.