विश्वासा पाटील यांच्या निवडीविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; साताऱ्यात जोरदार आंदोलन
पाटील हे आरक्षणविरोधी
17 September, 2025
- सातारा | दि.१७(जरंडेश्वर समाचार) :
- ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, साहित्यिक विश्वास पाटील यांच्या निवडीविरोधात वंचित बहुजन आघाडी (VBA) ने मोर्चा काढून जोरदार आंदोलन सुरू केले आहे. साताऱ्यात VBA ने पाटील यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना जिल्हा सचिव गणेश भिसे यांनी म्हटले की, "आमचा विरोध साहित्य संमेलनाला नाही, तर संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झालेल्या विश्वास पाटील यांना आहे. पाटील हे जातीयवादी मानसिकतेचे असून त्यांची विचारसरणी आरक्षणविरोधी आहे," असा थेट आरोप त्यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीने विश्वास पाटील यांच्या जुन्या विधानांचा दाखला देत त्यांच्यावर टीका केली आहे. "मला जातीचा दाखला मिळाला नाही, म्हणून खालच्या जातीच्या हाताखाली काम करावे लागले," असे विधान पाटील यांनी पूर्वी केले होते, ज्यामुळे त्यांची जातीयवादी मानसिकता उघड झाली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला.
केवळ विधानेच नव्हे, तर पाटील यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यांच्या साहित्यात विषमतावाद आणि जातीय मानसिकता दिसून येते, असा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
माफीची मागणी आणि आंदोलनाचा इशारा
वंचित बहुजन आघाडीने मागणी केली आहे की साहित्य संमेलनाचा अध्यक्ष सर्वसमावेशक असावा. त्यांनी विश्वास पाटील यांनी सार्वजनिकरित्या बहुजन समाजाची माफी मागावी, अन्यथा साताऱ्यात होणाऱ्या साहित्य संमेलनादरम्यान अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. १६ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे निषेध मोर्चा काढत आघाडीने पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
विश्वास पाटील यांचे स्पष्टीकरण
आपल्यावरील आरोपांनंतर विश्वास पाटील यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. "मी आरक्षणविरोधी नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही," असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या साहित्यिक कार्याचा उल्लेख करत त्यांनी 'झाडाझडती' सारखी कादंबरी लिहिली असून त्यात दलित समाजाच्या नायकाचे चित्रण आहे, तसेच त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावरही संशोधन केले आहे, असे सांगितले.
संघर्षाची तीव्रता वाढण्याची शक्यता
विश्वास पाटील यांच्या निवडीवरून सुरू झालेला हा वाद साताऱ्यातील सामाजिक वातावरणात नवीन संघर्ष निर्माण करत आहे. वंचित बहुजन आघाडी जातीयवाद आणि आरक्षणविरोधी विचारांविरुद्ध ठामपणे उभी राहिली आहे, तर पाटील स्वतःची भूमिका स्पष्ट करत आहेत. या वादामुळे आगामी साहित्य संमेलनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातारा जिल्ह्यातील विश्वविख्यात सहित्यिक आहेत त्यांचे अजून भूमिका स्पष्ट व्हायची आहे साहित्य संमेलन जसे जसे जवळ येईल तसं तसे साहित्य संमेलनाच्या विरोधात वातावरण तयार होईल. असं चित्र एकूण दिसत आहे.