.“साताऱ्याचे कास पठार : फुलोत्सवात उमलले आंतरराष्ट्रीय आकर्षण”
जपाननंतर आता दक्षिण कोरियाचे पर्यटकही ‘फुलांच्या स्वर्गा’त हरवले
18 September, 2025
कास | दि.१८ (जरंडेश्वर समाचार):-साताऱ्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेले कास पुष्प पठार… निसर्गाने रेखाटलेले जणू एखादे रंगीबेरंगी चित्र. हिरव्यागार गालिच्यावर उमललेली हजारो फुले आणि आकाशाशी स्पर्धा करणारे त्यांचे रंग. या नयनरम्य सौंदर्याने केवळ देशीच नाही, तर हजारो किलोमीटर दूरवरून आलेल्या परदेशी पर्यटकांनाही मोहिनी घातली आहे.
शनिवारी दक्षिण कोरियातून आलेल्या पाहुण्यांच्या पथकाने कास पठाराला भेट दिली. नामवंत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी असलेले एस. डब्ल्यू. शीम, बी. एच. चोई, जे. एम. कीम, माल गावन जंग आदींचे हेरिटेज वाडी येथे ढोल, ताशा, शिंग आणि पुष्पहारांनी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पारंपरिक आदरातिथ्य पाहून पाहुणे आनंदित झाले.
पठारावर यंदा तेरडा, गेंद, सीतेची आसवे, सोनकी, टोपली कारवी या दुर्मीळ वनफुलांचा गालिचा बहरला आहे. पावसाची रिपरिप ओसरून दोन दिवसांपासून उजाडलेले निळेशार आकाश, दाटून येणारे पांढरेशुभ्र ढग आणि थंडगार वारा – या सर्वांनीच फुलांच्या दुनियेला जणू जादुई स्पर्श दिला आहे.
परदेशी पाहुण्यांनी कुमुदिनी मार्गावरील बैलगाडी सफरीचा अनुभव घेतला. बैलगाडीतून हळुवार चालताना दोन्ही बाजूंना फुलांचा समुद्र पसरला होता. पाहुणे हा नजारा कॅमेऱ्यात कैद करत होते, तर अनेकांनी फुलांच्या सान्निध्यात सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. “ही सफर अविस्मरणीय आहे,” असे त्यांचे शब्द होते.
कास पठारावरील व्यवस्थापन, स्वच्छता आणि संवर्धनाचे प्रयत्न पाहून पाहुण्यांनी वनविभाग व स्थानिक समितीचे मनःपूर्वक कौतुक केले. “येथील फुलांची शोभा आणि निसर्गसंपदा अद्वितीय आहे. या ठिकाणाचा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील,” अशी प्रतिक्रिया दक्षिण कोरियाचे कार्यकारी व्यवस्थापक एस. डब्ल्यू. शीम यांनी दिली.
साप्ताहिक सुट्टीचा लाभ घेऊन देशी पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पठारावरील वातावरण सध्या अक्षरशः ‘फुलांचा स्वर्ग’ ठरत असून प्रत्येक पर्यटकाच्या मनावर गारुड करत आहे.