single-post

फलटण तालुका जलमय : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान – ८,८५४ शेतकरी संकटात

15 September, 2025

फलटण | दि. १५ (जरंडेश्वर समाचार): सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. या पावसामुळे खरीप पिके, फळबागा तसेच सार्वजनिक बांधकामांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

कृषी विभागाच्या अहवालानुसार, ७,३२८ शेतकऱ्यांच्या २,१८६.८५ हेक्टर क्षेत्रातील बागायती पिकांचे ३ कोटी ७१ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ७७६ शेतकऱ्यांच्या २९९.८८ हेक्टर फळबागांचे ६७ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, ७५० शेतकऱ्यांच्या २०१.५० हेक्टर शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. एकूण अंदाजे नुकसान ५ कोटी ३९ लाख रुपयांहून अधिक आहे.

तालुक्यातील ११ ग्रामतलाव, ४० रस्ते, पूल, शाळा व आरोग्य केंद्रांचे मिळून १९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवले आहे.

महसूल, कृषी व जिल्हा परिषद यंत्रणेच्या ३०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले असून भरपाईचे अनुदान काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी पंचनामे अपुरे असल्याचे आरोप केले असून तात्काळ मदत कोष निर्माण करण्याची मागणी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने शिखर शिंगणापूर व सीतामाई घाट रस्त्याचे संरक्षणभिंती, जुने पूल नव्याने बांधणे, रस्त्यांची दुरुस्ती व नवीन पूल उभारणीसाठी १४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांची मागणी तात्काळ मदत कोष निर्माण करणे पिकविमा दाव्यांची त्वरित पूर्तता करणे माफक दरात बियाणे व खते उपलब्ध करणे नाल्यांची दुरुस्ती करून पाण्याचा निचरा करणे भविष्यातील अतिवृष्टीपासून बचावासाठी धोरण आखणे