single-post

साताऱ्यात प्रथमच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची जिल्हा प्रशासनासोबत बैठक ; सेवा पंधरवड्यात इन्फ्लुएन्सर्सचा सहभाग महत्त्वाचा – जिल्हाधिकारी संतोष पाटील

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर ‘सेवा पंधरवडा’ उपक्रम राबविला जाणार

15 September, 2025

सातारा, दि. १५(जरंडेश्वर समाचार) : शासकीय योजनांचा अधिकाधिक प्रसार व नागरिकांपर्यंत सहज पोहोच व्हावी यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी साताऱ्यातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, “आज नागरिक सोशल मीडियाशी जोडले जात आहेत. शासनाच्या योजनांची माहिती या माध्यमातून दिल्यास ती जलद, आकर्षक आणि सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने पोहोचू शकते. प्रशासनाकडून आवश्यक माहिती देण्यात येईल, परंतु तिचे सादरीकरण सर्जनशील पद्धतीने करणे ही इन्फ्लुएन्सर्सची ताकद आहे. त्याद्वारे योजनांचा अधिकाधिक लाभ नागरिकांना होईल.”

सेवा पंधरवडा (१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) यामध्ये लोकहिताचे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना सहभागी होण्याचे आमंत्रणही त्यांनी दिले.

या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक रेशन दुकानासमोर एक नवीन पायलट प्रकल्प म्हणून क्युआर कोड लावण्यात येणार आहे. ग्राहकांनी तो स्कॅन करून रेशन वेळेत व नियमानुसार मिळाले का याबाबत अभिप्राय नोंदवता येईल. या उपक्रमाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी इन्फ्लुएन्सर्सना विशेष सहकार्य करण्याचे आवाहन केले.

बैठकीदरम्यान इन्फ्लुएन्सर्सनी आपल्यासमोर येणाऱ्या अडचणी स्पष्टपणे मांडल्या. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी त्या सर्वांचे ऐकून घेतले आणि योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

साताऱ्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससोबत शासकीय योजनांच्या प्रसारासाठी घेतलेली ही पहिलीच महत्त्वपूर्ण बैठक ठरली. या उपक्रमामुळे शासनाच्या योजनांबाबत जनजागृती अधिक परिणामकारक पद्धतीने होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.