सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास कामांना सप्टेंबर अखेरपासून सुरुवात-जिल्हाधिकारी संतोष पाटील
अजिंक्यतारा, प्रितीसंगम व स्वराज्य सृष्टीसह विविध प्रकल्पांचा आढावा
15 September, 2025
सातारा, दि. 15 :(जरंडेश्वर समाचार) सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यातील कामांना येत्या सप्टेंबर अखेरपासून सुरुवात करावी, तर प्रगतीपथावरील कामे डिसेंबरअखेर पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या. प्रलंबित असलेली व सुरू करावयाची कामे माहे मे 2026 पर्यंत पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पर्यटन विकास कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, कार्यकारी अभियंता श्रीपात जाधव, राहुल अहिरे कार्यक्रम अभियंता यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश,जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, कामांसाठी लागणारी ना हरकत प्रमाणपत्रे तातडीने मिळवावीत. काही कामांमध्ये अडचणी येत असल्यास संबंधित विभागाचे अधिकारी व काम करणाऱ्या एजन्सीने प्रत्यक्ष स्थळी जाऊन त्या अडचणी दूर कराव्यात. कामांच्या गतीला चालना देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा, असे त्यांनी नमूद केले.
महत्त्वाचे प्रकल्प,आढावा बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी पाटील यांनी खालील प्रकल्पांच्या आराखड्यांचा आढावा घेतला व प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अजिंक्यतारा किल्ला : जतन, संवर्धन व पायाभूत सुविधा विकास
पसिरा परिसर : सुशोभीकरण व सुविधा उभारणी
संगम माहुली व क्षेत्र माहुली : सुशोभीकरण
तळबीड (ता. कराड) : स्वराज्य सृष्टी प्रकल्प
कराड प्रितीसंगम : सुशोभीकरण प्रकल्प
पर्यटनातून जिल्ह्याच्या प्रगतीला चालना,जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह इतर पर्यटन विकास प्रकल्पांमुळे पर्यटकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील तसेच जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीस गती मिळेल.