single-post

बिबट्याने दुपारीच कुत्र्याचे पिल्लू उचलले

सातारा शहरातील रामरावनगरमध्ये बिबट्याची दहशत; सीसीटीव्हीत घटना कैद

16 September, 2025

सातारा | दि. १६ (जरंडेश्वर समाचार): सातारा शहरातील रामरावनगर गोडोली परिसरात दुपारी उघड्यावरच बिबट्याने कुत्र्याचे पिल्लू उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दुपारी बारा वाजता घडली असून कॉलनीतील घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर व्हिडिओमध्ये बिबट्या कॉलनीत निवांतपणे फिरताना दिसतो. त्याने पिल्लाला तोंडात पकडून सरळ रस्ता धरला आणि पळ काढला. ही वेळ दुपार असल्याने नागरिकांना या घटनेचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्यामुळे कॉलनीत भीती व चिंतेचे वातावरण आहे.

नागरिक भयभीत, वनखात्याकडे तक्रार,घटनेनंतर स्थानिकांनी वनखात्याकडे तक्रार नोंदवली आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनखात्याने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून पथके सतर्क करण्यात आली आहेत. “नागरिकांनी एकटे बाहेर पडणे टाळावे, लहान मुले व पाळीव प्राणी सुरक्षित ठेवावेत,” असे आवाहन निवृत्ती चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले आहे.

सीसीटीव्ही व सतर्कतेवर भर ,या घटनेनंतर परिसरात आणि शेजारील गावांमध्ये अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी होत आहे. वनखात्यानेही कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ कळविण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

रामरावनगरमध्ये घडलेली ही घटना बिबट्या दिवसाढवळ्या वस्तीमध्ये फिरत असल्याचे स्पष्ट करते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये बिबट्याच्या दहशतीचे सावट कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.