विश्वास पाटील यांच्या निवडीवर आक्षेप आंबेडकर स्मारक समितीकडून साहित्य महामंडळाचा निषेध
विश्वास पाटील यांच्या अध्यक्षपदी निवडीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा आक्षेप!"निवड रद्द करावी,
16 September, 2025
सातारा | दि. १६ (जरंडेश्वर समाचार) – साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक विश्वास पाटील यांची झालेली निवड वादग्रस्त ठरत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने या निवडीविरोधात तीव्र भूमिका घेत साहित्य महामंडळाचा निषेध नोंदवला आहे.
समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत व सरचिटणीस गणेश कारंडे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जातीय मानसिकतेच्या व्यक्तीला संमेलनाध्यक्षपदी बसवणे हा अपमान असून महामंडळाने याबाबत जनतेची माफी मागावी. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यामुळेच पाटील यांना साहित्यिक म्हणून संधी मिळाली. मात्र, सोशल मीडियावर जातीविषयी केलेल्या विधानांमुळे त्यांची प्रतिमा कलंकित झाली आहे.
“अशा व्यक्तीची अध्यक्षपदी झालेली निवड रद्द करण्यात यावी,” अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील व सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ बहुजन साहित्यिकांनी या संदर्भात आपली स्पष्ट भूमिका मांडावी, असे आवाहनही पत्रकातून करण्यात आले आहे.