महाबळेश्वरात माकडाच्या झडपेमुळे दुचाकी अपघात; आनंद जाधव यांचा मृत्यूपत्नी जखमी – मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून तात्पुरती आर्थिक मदत
वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीडित कुटुंबाला सांत्वन
16 September, 2025
महाबळेश्वर | दि.१६(जरंडेश्वर समाचार) : महाबळेश्वर–तापोळा रस्त्यावर चिखली गावच्या हद्दीत गुरुवारी दुचाकीवरून प्रवास करताना माकडाने झडप घातल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात आनंद सखाराम जाधव (रा. देवळी-मु.हा., ता. महाबळेश्वर) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत.
गुरुवारी सायंकाळी आनंद जाधव पत्नीसमवेत दुचाकीवरून महाबळेश्वरहून देवळीच्या दिशेने जात होते. चिखली परिसरात त्यांच्या दुचाकीवर अचानक एका माकडाने झडप घातली. त्यामुळे जाधव यांचा दुचाकीवरील ताबा सुटून दोघेही रस्त्यावर कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जाधव यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी अपघातात जखमी झाल्या आहेत.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी देवळी येथे जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी सुनिल लांडगे यांनी औषधोपचारासाठी आर्थिक मदतीचा चेक मंत्री पाटील यांच्या हस्ते सुपूर्त केला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, पंचायत समितीचे माजी सभापती धोंडीराम जंगम, प्रवीण भिलारे, शशिकांत भिलारे, सागर कदम, विठ्ठल जाधव, विजय ढेबे, निलेश जाधव, विकास जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यातील प्रमुख रस्ते, प्रेक्षणीय स्थळे व बाजारपेठांमध्ये माकडांचा उपद्रव वाढल्याचे स्पष्ट होत आहे. खाद्याच्या शोधात माकडांचा मुक्त वावर नागरिक व पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अन्न हिसकावणे, गाड्यांवर उड्या मारणे तसेच रस्त्याच्या मधोमध थवेने बसणे यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या आहेत.