single-post

रविवारी सातारा हिल मॅरेथॉन; वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल

हिल मॅरेथॉनदरम्यान सकाळी ५ ते १० वाहतूक बंद : मॅरेथॉनसाठी वाहतूक बदल, पर्यायी मार्ग जाहीर

11 September, 2025

रविवारी सातारा हिल मॅरेथॉन; वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल

सातारा, दि. 11 (जरंडेश्वर समाचार): येत्या रविवारी, दि. 14 सप्टेंबर रोजी सातारा शहरामध्ये सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या काळात शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पोलीस विभागाने तात्पुरते वाहतुकीतील बदल जाहीर केले आहेत. सकाळी ५ ते सकाळी १० या वेळेत ही मर्यादा लागू राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

मॅरेथॉनचा प्रारंभ पोलीस परेड ग्राउंड येथून होऊन पोवई नाका – मरिआई कॉम्प्लेक्स – शाहू चौक – अदालतवाडा – समर्थ मंदिर बोगदा – यवतेश्वर – प्रकृती हेल्थ रिसॉर्ट (५०० मीटर पुढे) असा होईल आणि त्याच मार्गाने परत परेड ग्राउंडवर स्पर्धेची सांगता होणार आहे. या मार्गावर रुग्णवाहिका, पोलीस व अग्निशामक दलाच्या वाहनांशिवाय इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग व्यवस्था :

शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोलीकडून येणारी सर्व वाहने ग्रेड सेपरेटरमार्गे डी.बी. कदम मार्केट – राधिका सिग्नलमार्गे शहरात ये-जा करतील.

बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून येणारी वाहने जिल्हा परिषद चौक – कनिष्क हॉल चौक – रिमांड होम – जुना आर.टी.ओ. चौक – अथवा बांधकाम भवन चौक – मुथा चौक – सुभाषचंद्र बोस चौक (भूविकास चौक) मार्गे ये-जा करतील.

मुख्य बसस्थानक – राधिका सिग्नल – तहसिल कार्यालय मार्गे जाणारी वाहने ग्रेड सेपरेटरमार्गे शहराबाहेर पाठवली जातील.

सज्जनगड, ठोसेघर, परळी कडून येणारी वाहने शेंद्रे – खिंडवाडी रोडमार्गे अंजठा चौक व गोडोलीकडून शहरात येतील.

कासकडून येणारी वाहने प्रकृती हेल्थ रिसॉर्टकडून थेट येणार नाहीत. ती एकीव फाटा – मोळेश्वर – कुसुंबीमुरा – कुसुंबी – मेढा मार्गे सातारा शहरात येतील.

पार्किंग व्यवस्था :स्पर्धक व नागरिकांनी आपली वाहने खालील ठिकाणी पार्क करावीत :प्रशासकीय इमारतीसमोरील मोकळे मैदान,जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद ग्राउंड रस्त्याच्या दोन्ही बाजू,जुना आर.टी.ओ. चौक ते वाढे फाटा रस्त्याच्या एका बाजूस,निर्मला कॉन्व्हेंट विद्यालय,सदर बाजार परिसर