single-post

अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर थांबवा - आ. महेश शिंदे यांचे व्यावसायिकांना आवाहन

कोरेगावमध्ये संवाद मेळाव्यात व्यावसायिकांना आवाहन;शत्रू राष्ट्रांच्या रसायनांनी आरोग्य धोक्यात; वार्षिक ५ हजार कोटींचा व्यवसाय

09 September, 2025

अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर थांबवा - आ. महेश शिंदे यांचे व्यावसायिकांना आवाहन

कोरेगाव (जरंडेश्वर समाचार): कोरेगाव मतदारसंघामध्ये अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा वाढता वापर आरोग्यासाठी गंभीर धोके निर्माण करत आहे. हे लक्षात घेता, अन्न आणि मिठाई व्यवसायातील व्यावसायिकांनी कृत्रिम रंगांचा वापर पूर्णपणे थांबवण्याचा निर्धार करावा, असे कळकळीचे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले.

​येथील हॉटेल दरबारच्या हॉलमध्ये आयोजित अन्न व्यावसायिकांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संतोष जाधव, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे, आरोग्य अधिकारी डॉ. आसिफ जमादार, डॉ. शंकर गांधीले, यांच्यासह तालुक्यातील असंख्य वैद्यकीय अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

आरोग्य धोक्यात, शत्रू राष्ट्रांचा हात

​आ. शिंदे यांनी सांगितले की, कृत्रिम रंग तयार करणारे देश भारताचे शत्रू राष्ट्र आहेत. भारतात दरवर्षी सुमारे ७ लाख ४६ हजार टन कृत्रिम रंग वापरला जातो, ज्याची किंमत अंदाजे ५ हजार कोटी रुपये आहे. हे रासायनिक रंग जेवण आणि मिठाईच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे हृदयरोग, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढले आहे आणि अकाली मृत्यूचे प्रमाणही  वाढले आहे.

​आ. शिंदे यांनी जागतिक स्तरावरील संशोधन अहवालांचा संदर्भ देत कृत्रिम रंगांचे दीर्घकाळ सेवन केल्यास पचनसंस्था, यकृत, रक्त आणि मेंदूवर वाईट परिणाम होतो, असे स्पष्ट केले. या रंगांमुळे पदार्थ क्षणभर आकर्षक दिसतात, पण ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत.

व्यवसायिकांनी एकमुखी निर्धार केला

​आ. महेश शिंदे यांनी सादर केलेल्या माहितीने उपस्थित व्यावसायिकांचे डोळे उघडले. अनेक पिढ्यांपासून हा व्यवसाय करत असतानाही कृत्रिम रंगांमधील भयावहता आम्हाला माहीत नव्हती, अशी कबुली त्यांनी दिली. आमदार शिंदेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत, यापुढे कृत्रिम रंगांचा वापर करणार नाही, असा एकमुखी निर्धार तालुक्यातील व्यावसायिकांनी केला आहे.

. या वेळी, कोरेगाव तालुका केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित कुंभार, उपाध्यक्ष राजेंद्र मतकर, प्रशांत साळुंखे, निलेश वाघ, सुनील घोरपडे आणि इतर व्यावसायिकांनी आ. महेश शिंदे आणि राजाभाऊ बर्गे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.