मुंबईत गणेश विसर्जन सोहळा : लाखो भाविकांची उपस्थिती,
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी हजारोची गर्दी
06 September, 2025
मुंबईत गणेश विसर्जन सोहळा : लाखो भाविकांची उपस्थिती
मुंबई दि.(जरंडेश्वर समाचार):– महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख मानला जाणारा गणेशोत्सव यंदाही अत्यंत उत्साहात पार पडत आहे. आज विसर्जन सोहळ्याच्या दिवशी मुंबईत सर्वत्र भक्तांच्या अलोट गर्दीने उत्सवाला विशेष रंगत आणली आहे. लालबागचा राजा, जीएसबी सेवा मंडळ, अंधेरीचा महाकाली गणपती, चेंबूरचा तिलकनगर गणेश, गिरगावचा सार्वजनिक गणेश यांसारख्या मानाच्या मंडळांच्या मिरवणुकींना पाहण्यासाठी शहरातील तसेच राज्यभरातून भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे.
ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकांच्या तालावर, पारंपरिक वाद्यवृंदांच्या साथीने मिरवणुका पुढे सरकत होत्या. रात्रभर चाललेल्या या सोहळ्यात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या गजराने वातावरण दुमदुमून गेले. देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांनीही विसर्जन मिरवणुकीचा अनुभव घेत मुंबईच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले.
मुंबई पोलिसांनी सुरक्षा व वाहतुकीची विशेष व्यवस्था केली आहे. हजारो पोलीस कर्मचारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, अग्निशमन दल व आपत्कालीन पथके सतत तैनात आहेत. शहरातील समुद्रकिनारे आणि कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी सोयी-सुविधांची काटेकोर व्यवस्था करण्यात आलेली आहे.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तब्बल लाखो भक्तांनी गर्दी केली होती. विसर्जन मिरवणुकीत सामील झालेल्या भक्तगणांनी श्रद्धा, आनंद आणि उत्साहाने बाप्पाला निरोप दिला जात आहे .
मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर उत्सवाची झलक दिसत आहे. विसर्जन सोहळ्याने पुन्हा एकदा गणेशोत्सव हा धार्मिकतेसोबतच लोकएकतेचा, सामाजिक भावनेचा आणि संस्कृतीचा अद्वितीय उत्सव असल्याचे अधोरेखित होत आहे.