single-post

सिंदखेडराजा : राजमाता जिजाऊ स्मारकाला नवी झळाळी; आमदार शशिकांत शिंदे यांच्या पुढाकाराला यश

राजमाता जिजाऊ स्मारक संवर्धनासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाचा हिरवा कंदील; सिंदखेडराजात उत्साह ; अर्ध्या तासात मार्ग मोकळा! आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्तक्षेपाने राजमाता जिजाऊ स्मारकाच्या दुरुस्तीला गती*

11 September, 2025

सिंदखेडराजादि.११ (जरंडेश्वर समाचार): राजमाता जिजाऊ स्मारकाला नवी झळाळी; आमदार शशिकांत शिंदे यांच्या पुढाकाराला यश त्याग, संस्कार आणि दूरदृष्टीच्या बळावर हिंदवी स्वराज्याचे बीज रोवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्यामुळेच स्वराज्याचा सुवर्ण इतिहास घडला. अशा या प्रेरणास्थानाच्या स्मारकाची अवस्था गेल्या काही काळापासून योग्य नसल्याची खंत व्यक्त होत होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी पुढाकार घेताच हा विषय अवघ्या काही तासांत मार्गी लागल्यामुळे शिवप्रेमींमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे

भारतीय पुरातत्त्व विभागाशी थेट संपर्क,मराठवाड्यातील जालना व बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असलेल्या आमदार शशिकांतजी शिंदे यांनी मंगळवारी संध्याकाळी सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ साहेबांच्या जन्मस्थळाला भेट दिली. यावेळी राजमाता जिजाऊंचे वंशज श्रीमंत शिवाजीराजे जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, ॲड. रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष रेखा खेडेकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र अंभोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्मारकाची दुरावस्था मांडल्यानंतर आमदार शिंदे यांनी तत्काळ भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी तेजस गर्ग यांच्याशी थेट संपर्क साधला व चर्चा विचार विनिमय केला.. स्मारक स्थानिक नगरपालिकेच्या हद्दीत असल्याने त्याची देखभाल व दुरुस्ती नगरपालिकेची जबाबदारी आहे. स्मारकाची दुरुस्ती केली जाणे अपेक्षित असल्याचे गर्ग यांनी स्पष्ट केले. मात्र "वैभव संगोपन योजने"च्या माध्यमातून नगरपालिकेने तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि विभाग त्यावर सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही त्यांनी आमदार शिंदे यांना दिली.

छत्रपती  शिवाजी महाराजांचा एक मावळा या नात्याने राजमाता जिजाऊंच्या स्मारकाविषयी लक्ष घातल्याने अवघ्या अर्ध्या तासात हा महत्त्वाचा विषय मार्गी लागल्याचा आनंद असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. स्मारकाच्या संवर्धनासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक श्यामभाऊ मैत्री, विजूभाऊ तायडे, नरूभाऊ तायडे, बबन मस्के, मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष डॉ. बालाजी कळकुंबे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा ज्योतीताई जाधव, सिताराम चौधरी, जगन्नाथ सहाने, सतीशभाऊ काळे यांच्यासह कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"जिजाऊंचे विचार आजही प्रेरणादायी",पत्रकारांशी बोलताना आमदार शिंदे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे अद्वितीय व्यक्तिमत्व घडवणाऱ्या प्रेरणामूर्ती राजमाताजिजाऊ यांना नतमस्तक होऊन वंदन करण्याचा मला सन्मान लाभला. त्यांच्या विचारांमुळे आजही प्रत्येक पिढीला नवा आत्मविश्वास व दिशा मिळते. त्यांच्या स्मारकाचे संगोपन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन."

लवकरच या विषयावर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांना निवेदन सादर केले जाणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारसमोरही हा मुद्दा उपस्थित करून स्मारकाच्या संरक्षणासाठी तातडीने निधी व उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करणार आहे.

राजमाता जिजाऊंच्या स्मारकाला नव्याने झळाळी मिळावी यासाठी झालेल्या या पुढाकारामुळे सिंदखेडराजा व बुलढाणा जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.