single-post

कोरेगाव-वाठार रस्त्यावर अपघातांची मालिका; ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी

दि.२५ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन

10 September, 2025

कोरेगाव-वाठार रस्त्यावर अपघातांची मालिका; ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी

२५ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन

कोरेगाव दि. १० (जरंडेश्वर समाचार):-कोरेगाव-वाठार मार्गावरील खोदकाम व निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे होणाऱ्या अपघातांबाबत स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. या रस्त्याचे काम करणाऱ्या शिवसमर्थ कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे व तात्काळ गुन्हा नोंद करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जर योग्य ती कारवाई झाली नाही तर २५ सप्टेंबर २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे यांनी दिला आहे.

अपघातांची साखळी सुरूच,कोरेगाव ते वाठार हा रस्ता पावसाळ्यात अक्षरशः खड्ड्यात बदलला आहे. रस्त्याचे पाच ते दहा फूट खोदकाम करून ठेवण्यात आले असून, कुठल्याही प्रकारचे सुरक्षा उपाय (सेफ्टी फॅक्टर, रोड सेफ्टी रिफ्लेक्टर, बेरिकेटिंग टेप इ.) करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मोठ्या खड्ड्यांत पाणी साचून रस्त्याची स्थिती अधिकच धोकादायक बनली आहे.

यात आतापर्यंत शेकडो अपघात झाले असून, कोरेगाव पोलीस स्टेशनमधील महिला कर्मचारी यांचा हात मोडला आहे, गर्भवती महिला गाडीवरून पडल्याची घटना घडली आहे, तसेच अनेक तरुण-तरुणी जखमी झाले आहेत. नागरिक गंभीर जखमी होण्याच्या घटना रोजच घडत असून, नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

“संपूर्ण रस्ता का खोदला?”संबंधित कंपनीकडे पुरेशी यंत्रणा नसेल तर संपूर्ण रस्ता खोदण्याऐवजी एक बाजू खुली ठेवून दुसऱ्या बाजूचे काम करणे शक्य होते. परंतु हे न करता संपूर्ण रस्ता उखडून टाकल्याने नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. यापूर्वी सातारा-पंढरपूर मार्गावरील मेधा इंजिनीअरिंग कंपनीच्या निकृष्ट कामामुळे ५१ अपघातात नागरिकांचा बळी गेला होता, त्याच धर्तीवर कोरेगाव-वाठार रस्ता आता मृत्यूचा सापळा ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांना निवेदन,या प्रकरणाची चौकशी करून ठेकेदारावर गुन्हा नोंदवण्याची व कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित पोलीस अधिकारी यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.

आंदोलनाची हाक,“दररोज होणारे अपघात आम्ही आणखी किती दिवस सहन करायचे? जर ठेकेदार कंपनीवर तात्काळ कारवाई झाली नाही तर मी स्वतः २५ सप्टेंबर २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसणार आहे,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे यांनी दिला आहे.