single-post

गणेशोत्सव देखाव्यापासून लोकांचा कल कमी..!गावोगाव साधेपणाने गणेशोत्सव – भव्यतेला ‘ब्रेक’

तरुणाईचा कल देखाव्यांपेक्षा करिअर आणि सोशल मीडियाकडे..!

04 September, 2025

पुणे/मुंबई/सातारा दि.४ (जरंडेश्वर समाचार) : गणेशोत्सव म्हटला की भव्य मंडप, रंगीबेरंगी देखावे आणि उत्साहाचा जल्लोष अशी प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भाग तसेच शहर भागात गणपतीच्या देखाव्यांकडे लोकांचा कल कमी होत चालला आहे. विशेषत: तरुणाईची या उपक्रमांमध्ये रुची घटल्याचे स्पष्ट दिसत आहे.

ग्रामीण भागातील बदल,गावागावांत पूर्वी गणपती मंडपांमध्ये देखाव्यांची स्पर्धा ही प्रमुख आकर्षणाची बाब होती. परंतु आता गावकऱ्यांचा भर साधेपणाने पूजा करण्यावर आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर दिसून येतो. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती अभियान यांसारख्या उपक्रमांना युवक मंडळांची प्राधान्यक्रमाने पसंती मिळत आहे.

शहरी तरुणाईचा कल, शहरांतील तरुणाई करिअर, शिक्षण आणि तंत्रज्ञानाकडे अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. त्यामुळे देखावे पाहण्याची परंपरा हळूहळू कमी होत आहे. त्याऐवजी ऑनलाइन आरती, थेट प्रक्षेपण वा सोशल मीडियावर दर्शन घेण्याची सोय अधिक लोकप्रिय होत आहे. गर्दी व वेळ वाचवून श्रद्धा व्यक्त करण्याची ही नवी पद्धत ठरत आहे.

गणेशोत्सवातील श्रद्धा अबाधित असली तरी श्रद्धेपेक्षा विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन लोक स्विकारताना दिसतात. पर्यावरणपूरक मूर्ती, ध्वनीप्रदूषण नियंत्रण, साधेपणावर भर या गोष्टींना समाजाची पसंती मिळत आहे.

उत्सवाचे नवे स्वरूप,देखाव्यांची चमक  कमी झाली आहे, गणेशोत्सव अधिक समाजोपयोगी, पर्यावरणपूरक आणि जागरूक बनताना दिसतो आहे. विज्ञानवादाकडे तरुणाई मोठ्या प्रमाणात झुकताना दिसत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणाई आता उद्योग व्यवसायाकडे झुकताना दिसत आहे. सामान्य जनता विज्ञानवादी कास धरत असतानाही श्रद्धा आणि परंपरा जपण्याचा समतोल लोक साधत आहेत, हेच या बदलाचे खरे वैशिष्ट्य ठरत आहे.