मराठा आरक्षणाविरोधात साताऱ्यातून ओबीसींचा हल्लाबोल;ओबीसी संघटनांचा मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणातील समावेशास ठाम विरोध..!
आरक्षणावरून पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हे
03 September, 2025
ओबीसी संघटनांचा मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणातील समावेशास ठाम विरोध..!
सातारा, दि. ३ (जरंडेश्वर समाचार):भारतीय मागील ओबीसी शोषित संघ व सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने आज जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना निवेदन सादर केले. या निवेदनात मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणातील समावेश हा असंवैधानिक असल्याचा ठपका ठेवत, तो तात्काळ थांबवावा अशी मागणी करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे, कार्याध्यक्ष रामचंद्र बनवडे, महासचिव प्रमोद क्षीरसागर तसेच जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन देण्यात आले.
ओबीसींसाठी उपलब्ध असलेल्या २७ टक्के आरक्षणात मराठा समाजाला बोगस कुणबी दाखल्यांद्वारे प्रवेश मिळत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.
मंडल आयोग, कालेलकर आयोग, रेणके आयोग तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल हे मराठा समाज मागास नसल्याचे स्पष्ट करतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
संघटनेच्या मते, शासनाने २००४ मध्ये केलेला ‘मराठा कुणबी’ व ‘कुणबी मराठा’ या पोटजातींचा ओबीसी यादीतील समावेश हा चुकीचा असून तो रद्द करण्यात यावा. त्याचबरोबर ५८ लाख मराठ्यांना दिले गेलेले बोगस कुणबी दाखले तातडीने रद्द करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मराठा समाजाचा ओबीसींमध्ये कोणत्याही प्रकारे समावेश होऊ नये. न्या. संदीप शिंदे समिती बरखास्त करावी. जातीचे दाखले आधारकार्डशी लिंक करावेत जेणेकरून बोगस प्रमाणपत्रांना आळा बसेल, ओबीसींचा नोकऱ्यांमधील अनुशेष तात्काळ भरावा. संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या १५ दिवसांत शासनाने निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल. या निर्णयास संघटनेच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी एकमताने पाठिंबा दिला आहे.