single-post

स्त्री साक्षरता : अजूनही प्रवास बाकी आहे!

८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिनानिमित्त लेख

06 September, 2025

स्त्री साक्षरता: अजूनही प्रवास बाकी आहे!

'जागा झाला सूर्य नभात,

ज्ञानदीप लावा अंतरी,

स्त्री झाली साक्षर जेव्हा,

तेव्हा फुले समाजश्री.'

८ सप्टेंबर – जागतिक साक्षरता दिन. संपूर्ण जगभर या दिवशी ‘साक्षरतेचा दीप’ पेटवला जातो. ज्ञानाचा प्रकाश समाजातील अज्ञानरूपी अंधःकार दूर करतो. मात्र या प्रकाशाच्या प्रवासात स्त्री साक्षरतेचे महत्त्व वेगळ्या शब्दांत सांगावे लागते, कारण 'जगाचा अर्धा भाग स्त्री आहे, पण तिच्या हातातील अर्धवट पेटलेला दिवा अजूनही पूर्ण उजेड देत नाही.'

सन २०११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१ कोटी होती. त्यापैकी ५८.६४ कोटी स्त्रिया होत्या. परंतु साक्षर स्त्रियांची संख्या केवळ ३९.६ कोटी इतकी नोंदली गेली. म्हणजेच स्त्री साक्षरतेचे प्रमाण ६५.४६% इतके होते, तर पुरुष साक्षरतेचे प्रमाण ८२.१४% होते. या आकडेवारीतून स्पष्ट होते की स्त्रिया अजूनही साक्षरतेत मागे आहेत. त्याच जनगणनेनुसार देशभरात सुमारे २४ कोटी ८२ लाख असाक्षर होते. त्यानंतर साक्षर भारत व पढना लिखना योजनेअंतर्गत काहीजण साक्षर झाले असले, तरी आजही देशभरात सुमारे १८ कोटी निरक्षर असल्याची शक्यता आहे. कारण २०११ नंतर जनगणना झालेली नाही आणि सद्यस्थितीत अचूक आकडेवारी उपलब्ध नाही.

२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११.२ कोटी असून त्यातील स्त्रिया ५.४ कोटी होत्या. त्यापैकी साक्षर स्त्रियांची संख्या ३.५ कोटी एवढी होती. स्त्री साक्षरतेचे प्रमाण ७५.८७% असून राष्ट्रीय सरासरीपेक्षा थोडे अधिक आहे, तरीही पुरुषांच्या तुलनेत लक्षणीय दरी दिसते. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात पंधरा वर्षांवरील ५३ लाख पुरुष असाक्षर तर त्यापेक्षा दुपटीहून अधिक म्हणजे १ कोटी १० लाख स्त्रिया असाक्षर होत्या. त्यामुळे एकूण असाक्षरांची संख्या १ कोटी ६३ लाख इतकी होती. ही आकडेवारी केवळ संख्या नाही; तर प्रत्येक अंकामागे दबलेली स्वप्ने, विझवलेली आकांक्षा आणि न उमललेली जीवनफुले दडलेली आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर साक्षरतेसाठी अनेक कार्यक्रम राबवले गेले – राष्ट्रीय साक्षरता अभियान, सर्व शिक्षा अभियान, साक्षर भारत अभियान आणि आजचा उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम. महाराष्ट्रात साक्षर भारत ही योजना त्या दहा जिल्ह्यांत राबवली गेली जिथे स्त्री असाक्षरता ५० टक्क्यांपेक्षा अधिक होती. त्यातून काही महिला साक्षर झाल्या असतील, परंतु त्याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र आजचा 'उल्लास' कार्यक्रम केवळ वाचन-लेखनापुरता मर्यादित नाही, तर डिजिटल साक्षरता, आर्थिक व्यवहार, आरोग्य जागरूकता आणि जीवन कौशल्याचे शिक्षण यावरही भर देतो. हे खऱ्या अर्थाने स्त्रीला “आधुनिक युगातील शहाणी माता” बनवणारे पाऊल आहे.

या प्रयत्नांना यशाची चिन्हे दिसू लागली आहेत. मार्च २०२४ मध्ये झालेल्या उल्लास परीक्षेत १.३० लाख पुरुष आणि २.९५ लाख स्त्रिया असे मिळून ४.२५ लाख जण उत्तीर्ण झाले. तर मार्च २०२५ मध्ये ही संख्या वाढून १.८८ लाख पुरुष आणि तब्बल ४.८० लाख स्त्रिया असे मिळून ६.६७ लाख उत्तीर्ण झाले. या आकडेवारीतून स्पष्ट होते की स्त्रिया शिक्षणाच्या संधीचे स्वागत मोठ्या उत्साहाने करत आहेत आणि स्वतःच्या तसेच समाजाच्या प्रगतीसाठी काही अंशी पुढे येत आहेत. मी या योजनेत यापूर्वी राज्यस्तरावर काम करत असताना केवळ शासकीय योजना म्हणून त्याकडे न पाहता अतिशय तळमळीने योजनेच्या अंमलबजावणीत भाग घेतला.

भारतीय समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाला प्रचंड महत्त्व दिले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंसह मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून काळाच्या प्रवाहाला नवे वळण दिले. सावित्रीबाई फुले यांची शिकवण – “विद्येचे दान हेच खरे दान.” महात्मा गांधी म्हणाले – “स्त्री शिक्षणाशिवाय समाजाचा उत्थान होऊच शकत नाही.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या शिक्षणासाठी संविधानात हक्काची हमी दिली. महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणात उल्लेखनीय कार्य केले. या महापुरुषांच्या कार्य व त्यागामुळे आजचा समाज ज्ञानप्रकाशाकडे झुकला, परंतु अद्याप बरीच पायवाट अपुरी आहे.

स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक असाक्षर राहिल्या त्यामागे अनेक कारणे आहेत – लिंगभेद व सामाजिक रूढी, लवकर लग्नाची प्रथा, आर्थिक असमानता, शैक्षणिक साधनांची कमतरता आणि स्त्रियांच्या शिक्षणाबाबतची उदासीन मानसिकता ही त्यातील प्रमुख कारणे होत. यामुळे स्त्रियांच्या शिक्षणात सातत्य राहिले नाही आणि त्यांच्या क्षमतेवर अंधुक पडदा पडला.

या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. प्रत्येक मुलीसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण, कन्या शाळा व वसतिगृहे उभारणे, शिष्यवृत्ती व प्रोत्साहन योजना राबवणे, स्त्री साक्षरतेसाठी स्वयंसेवी संस्था, ग्रामसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग वाढवणे, डिजिटल शिक्षण व ई-लर्निंग साधनांचा वापर या उपक्रमांतून स्त्री साक्षरतेची गती वाढवता येईल.

स्त्री साक्षर झाली की ती आरोग्यदायी कुटुंबाची मूळ रचनाकार ठरते. ती मुलांना योग्य संस्कार व मार्गदर्शन देते. आर्थिक स्वावलंबनाची वाट मोकळी करते. समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ प्राप्त करते. खरं तर, तिच्या हातातील ज्ञानदीप घरापुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजाला प्रकाशमान करतो.

मराठी कवितांमध्येही स्त्री साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे –

“दे तिला अक्षरांचे दान,

फुलेल तिचे आयुष्य महान;

जगाच्या पाठीवर उजळेल,

साक्षर स्त्रीचे सुंदर भान.”

अशा अलंकारिक शब्दांनी स्त्री साक्षरतेचा दीप अधिक तेजस्वी होतो.

१९६६ साली यूनेस्कोने ८ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून जाहीर केला. त्यामागील हेतू – जगभरातील निरक्षरता दूर करणे आणि शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे. आज डिजिटल युगात साक्षरतेला नवा अर्थ मिळाला आहे. केवळ वाचता-लिहिता येणे पुरेसे नाही, तर डिजिटल व्यवहार, तंत्रज्ञानाची जाण, माहितीचा सुजाण वापर या बाबीही आवश्यक झाल्या आहेत. निरक्षर या शब्दात नकारात्मक भाव प्रकट होत असल्याने आता असाक्षर हा शब्द जाणीवपूर्वक वापरला जात आहे.

साक्षरतेचे विविध प्रकार समजून घेतले तर आजच्या काळातील तिचा व्यापक आशय उलगडतो –

१. पारंपरिक साक्षरता – वाचता, लिहिता आणि मोजता येणे (उदा. पाटीवर लिहिणे, बेरीज-वजाबाकी करणे).

२. युनेस्कोची व्याख्या (१९५८) – सोपी वाक्ये वाचणे व लिहिणे, आणि त्यांचा उपयोग करणे (उदा. पत्र वाचणे).

३. कार्यात्मक साक्षरता – दैनंदिन व्यवहारात वाचन-लेखनाचा वापर (उदा. बँक फॉर्म भरणे).

४. माहिती साक्षरता – माहिती शोधणे, समजणे व योग्य वापर (उदा. संशोधनासाठी माहिती गोळा करणे).

५. डिजिटल साक्षरता – संगणक, मोबाईल, इंटरनेटचा सुरक्षित व उपयुक्त वापर (उदा. ऑनलाइन व्यवहार).

६. माध्यम साक्षरता – माध्यमातील माहितीचे परीक्षण व योग्य निर्णय (उदा. खोट्या बातम्या ओळखणे).

७. आर्थिक साक्षरता – पैशाचे नियोजन, बँकिंग, गुंतवणूक समजून घेणे (उदा. बचत खाते चालवणे).

८. आरोग्य साक्षरता – आरोग्यविषयक माहिती समजून घेणे (उदा. औषधाची मात्रा पाळणे).

९. सामाजिक-सांस्कृतिक साक्षरता – परंपरा, हक्क व जबाबदाऱ्या समजणे (उदा. मतदान करणे, सामाजिक कार्यात सहभाग).

ही सगळी साक्षरता एकत्र आल्यावरच खऱ्या अर्थाने सुजाण व सशक्त समाजाची निर्मिती होते.

स्त्री साक्षरतेचा प्रश्न हा केवळ शिक्षणाचा नाही, तर तो समानतेचा, सन्मानाचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. स्त्रीला ज्ञान दिले तर ती घराला उभारी देते, समाजाला दिशा देते आणि राष्ट्राला सामर्थ्य देते. संयुक्त राष्ट्रसंघाने सतत टिकणाऱ्या विकासाचे उद्दिष्टे (SDGs) जाहीर करताना “सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण” या ध्येयाला विशेष महत्त्व दिले. हे ध्येय विशेषतः स्त्रिया व मुलींना सशक्त करण्यासाठी आहे. कारण स्त्री सशक्त झाली की कुटुंब, समाज आणि राष्ट्र बलशाली होते.

आज जागतिक साक्षरता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकच संकल्प करायला हवा –

“प्रत्येक मुलगी शाळेत, प्रत्येक स्त्री साक्षर,

हा प्रकाशाचा मार्ग, हीच प्रगतीची दिशा.”

- राजेश क्षीरसागर,

 विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ.